तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्देवी मृत्यू;वाळूज रांजणगावातील घटना

0
6

मुलांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी फोडला हंबरडा.
तर गावात पसरली शोककळा

छत्रपती संभाजीनगर- जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले आहे. बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय 12 वर्षे), अफरोज जावेद शेख (वय 12 वर्षे), जावेद शेख (वय 14 वर्षे), अबरार जावेद शेख (वय 12वर्षे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावं आहे.

अधिक माहितीनुसार, रांजणगावातील जावेद शेख यांची अफरोज शेख (१४), अबरार शेख (१२) ही दोन मुले आपले मित्र बिश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय व अन्य एकासोबत गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते. सांयकाळी ५ वाजले तरी मुले घरी न आल्याने जावेद शेख हे आपल्या इतर नातेवाईकांना सोबत घेऊन आपल्या मुलांचा परिसरात सर्वत्र शोध घेत होते. ही शोध मोहिम सुरु असतांना रांजणगावच्या बनकरवाडीलगत असलेल्या पाझर तलावाजवळ जावेद शेख व त्यांचे नातेवाईक मुलांना शोधत होते. तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आल्याने जावेद शेख यांना मुले तलावात बुडाल्याचा संशय आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी जावेद शेख यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्नीशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात दिली.घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहचले.त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले आहे. मात्र या चारही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान यावेळी वाळूज अग्नीशमन दलाचे पी.के.चौधरी, के.टी.सुर्यवंशी, पी.के.हजारे, एन.एस.कुमावत, एस.बी.महाले, वाय.डी.काळे, एस.बी.शेंडगे यांनी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास नागरिकांच्या मदतीने अफरोज शेख अबरार शेख, बिश्वजीतकुमार व अन्य एक अशा चार मुलांना बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गणेश ताठे, उपनिरीक्षक पुंडलीक डाके, शिवाजी घोडपडे, पोकॉ. योगेश शळके आदींनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने या चार जणांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतुन शासकीय रुग्णालयात रवाना केले.

रांजणगावात पसरली शोककळा

गावातील पाझर तलावात चार शाळकरी मुले बुडाल्याची माहिती वा-यासारखी रांजणगावात पसरली होती. यावेळी प्रभाकर महालकर, दत्तु हिवाळे, दीपक बडे, जावेद शेख, साईनाथ जाधव, दीपक सदावर्ते आदींनी तलावातुन मुलांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.