संत गोरोबा काका मंदिराचा सर्वांगीण विकास करा; तालुकाप्रमुख लाकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
16
धाराशिव : श्रीक्षेत्र तेर येथील संत गोरोबा काका यांचे प्राचीन मंदिर असून, लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र सोयी-सुविधांच्या अभावी भाविकांचे हाल होत आहेत. त्यामुळे गोरोबा काकांच्या मंदिर व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन गाव आहे. सातवाहनांच्या उपराजधानीचा दर्जा असलेले हे नगर, त्यांच्या आर्थिक राजधानीचे शहर म्हणून तगर नावाने ओळखले जात होते. या प्राचीन शहराचा संबंध जैन व हिंदू या धर्माशी तर होताच पण त्याचबरोबर शैव, वैष्णव शाक्त, गाणपत्य असे अनेक संप्रदायही या ठिकाणी गुण्या-गोविंदाने नांदले. आजही या गावात या सर्व धर्मसमभावाने राहतात. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शिवमंदिरांपैकी दोन शिवमंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. याच बरोबर या गावाची ओळख संत ज्ञानेश्वर व नामदेव यांना समकालीन असलेले संत श्री गोरोबा काकांचे गाव म्हणून आहे. यामुळे सर्व धर्म संप्रदायाचे भाविक, वारकरी व पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी होते. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्राथमिक सुविधा नाहीत. संत गोरोबा काकांच्या महिन्याच्या वारीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सुमारे ५० हजाराच्या घरात असले तर वार्षिक यात्रा म्हणजे गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्यास चैत्र वद्य दशमी ते अक्षय तृतीया या कालावधीत सुमारे तीन ते चार लाख भाविक हजेरी लावतात. तरीही येथे अजूनही कोणत्याही स्वरुपाच्या पायाभूत सुविधा देखील निर्माण झालेल्या नाहीत. या अनुषंगाने भाविक व पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, संत गोरोबा काका मंदिराचा जीर्णोद्धार आणि या मंदिराचे पूर्व प्रवेशद्वार बांधकाम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सांडपाण्याचे नियोजन, मंदिरासमोरील मोकळ्या जागेत गाड्यांच्या पार्किंगची सोय आणि प्रसाद स्टॉलसाठी काही दुकाने, तेरणा नदीवर स्नान व विसर्जन घाट निर्मिती आदींचा प्राधान्यक्रम ठरवून पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच गोरोबा काकांच्या मंदिर परिसरातील मोडकळीस येत असलेल्या इसवी सनाच्या सहाव्या सातव्या शतकातील भगवान कालेश्वर मंदिराचा प्रश्न अधिक गंभीर आहे. यामुळे या कालेश्वर मंदिराची पुरातत्वीय निकषानुसार पुनर्निर्मिती करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने या मंदिरास पर्यटन वा तीर्थक्षेत्राचा अ’ दर्जा मिळाल्यास येथील विकास कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे मंदिराचा सर्वांगिण विकासासाठी निधी देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, माजी खा. रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, विभागीय संपर्क नेते आनंद जाधव, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, डीसीसी बँकेचे संचालक केशव सावंत आदींची उपस्थिती होती.