लातूरच्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करा -महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

0
8

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 :  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  आणि नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी  सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

लातूर येथे मराठवाडा विभागांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या महारोजगार मेळाव्याच्या पुर्वतयारीचा छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत महसूलमंत्री श्री. विखे-पाटील यांनी आज आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपायुक्त जगदीश मिनीयार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.तसेच मराठवाडयातील सर्व जिल्हयांचे जिल्हाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते.

श्री. विखे पाटील म्हणाले, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व बीड जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींसाठी विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ 24 फेब्रुवारी रोजी लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोमध्ये  विविध औद्योगिक शासकीय व खाजगी संस्था सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनव्हेस्टर्स व इन्क्यूबेटर्स या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महारोजगार मेळाव्यासाठी स्टार्टअप व विविध उद्योगांचा सहभाग आवश्यक असून उद्योगांसाठी किती व कोणत्या स्वरूपाचे मनुष्यबळ गरजेचे आहे, याची माहिती संकलित करून त्यानुसार क्षेत्रनिहाय उमेदवारांची विभागणी केली तर सुलभता येईल. मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नावनोंदणी करावी यासाठी जास्तीत जास्त उद्योजक आणि विविध शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत. नमो महारोजगार मेळाव्यात नोकरीइच्छुक उमेदवार यांचा सहभाग वाढावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,असेही मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले.

महारोजगार मेळाव्यास येणाऱ्या उमेदवारास रोजगाराबाबत मार्गदर्शन, प्रशिक्षण, कौशल्य विकासातील संधी याबाबत माहिती दिली जाणार आहे. मराठवाडयातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्हयातील रोजगारासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची क्षेत्रनिहाय रोजगार संधी याबाबत नियोजन करावे. तसेच येणाऱ्या युवक-युवती यांच्यासाठी समन्वय अधिकारी नेमावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

माजी मंत्री संभाजी पाटील – निलंगेकर यांनी महारोजगार मेळाव्याच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी महारोजगार मेळाव्याच्या तयारीबाबत माहिती दिली.

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर, पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेत रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील, त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत.नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.