जय भवानी, जय शिवराय…जय जिजाऊ निनादाने संपूर्ण शहर झाले शिवमय

0
9
 ठिकठिकाणी आरती व फुलांच्या वर्षावामध्ये जल्लोषात व जंगी स्वागत
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) – संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवरायांची जयंतीनिमित्त सर्वत्र विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. धाराशिव शहरातील शिवजन्मोत्सव सोहळा रिक्षा समितीच्यावतीने दि.१८ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या शिव रिक्षा रॅलीचे धाराशिव शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोषात व उत्साहामध्ये फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. दरम्यान, या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय…. जय भवानी जय शिवराय, राजमाता जिजाऊंचा जयजयकार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा रिक्षा समितीच्यावतीने गेल्या १२ वर्षापासून संपूर्ण धाराशिव शहरातून भव्य रॅली काढण्यात येत असून हे १३ वे वर्षे आहे. या रॅलीमध्ये हिंदू, मुस्लिम यांच्यासह सर्व धर्मीय रिक्षा चालक स्वतःहून सहभाग नोंदवित आहेत. या रॅलीचा शुभारंभ रविवार दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पिवळी टाकी चौकामध्ये बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, शिवजन्मोत्सव सोहळा रिक्षा समितीचे अध्यक्ष बुवा उंबरे, उपाध्यक्ष पिंटू पांढरे, प्रसेंजित शिंगाडे, अशोक उंबरे, नितीन काळे, राजसिंह राजेनिंबाळकर, पांडुरंग लाटे, अभय इंगळे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला. छत्रपती शिवरायांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांचा जयजयकार करण्यात आला.
यावेळी रमेश यादव, अभिराज निंबाळकर, वैभव उंबरे, बंटी पवार, बालाजी कुंभार, तानाजी शिंदे, शशिकांत भोसले, अनिल मोळे, सतीश घोडके, दत्ता शेवाळे, शरद उंबरे, संतोष पवार, अजय डोंगे, अर्जुन पवार, विश्वास ढोबळे, महेश उंबरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकूर, आदींसह मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तर  या रॅलीत १५० पेक्षा जास्त रिक्षांचा समावेश आहे.
 ही रिक्षा रॅली उंबरे कोटा येथून राजमाता जिजाऊ चौकात जिजाऊंना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारती येथील महात्मा बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन केले. तर ताजमहल टॉकीज, देशपांडे स्टॅन्ड, विजय चौक, नेहरु चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस कार्यालय, त्रिसरण चौक, लेडीज क्लब चौक मार्गे राजमाता जिजाऊ चौकामध्ये या रॅलीचे विसर्जन करण्यात आले.