पंकजा मुंडेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार?

0
9

बीड- भाजपतर्फे पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. पंकजा मुंडे या बीडमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या समोरील आव्हाने वाढणार आहेत.बीडमध्ये यशवंत सेनेने पंकजा मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशातच आता शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर, याच जागेवरुन शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे देखील निवडूक लढण्यास इच्छुक आहेत.

बीड लोकसभा मतदाससंघात पंकजा मुंडेंना आव्हान देण्यासाठी शरद पवार मेटे कार्ड खेळण्याची शक्यता आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. बीडची जागा पवारांच्या राष्ट्रवादीला गेली आहे. त्यामुळे ज्योती मेटे पवारांच्या भेटीला पुण्यात त्यांच्या मोदी बागेतल्या निवास्थानी गेल्या आहेत.

ही चर्चा यशस्वी झाली तर पंकजा मुंडेंना ज्योती मेटेंचं मोठं आव्हान असणार आहे. या चर्चेत आमदार अशोक पवारही उपस्थित आहेत.बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे बजरंग सोनवणे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानं सोनवणे नाराज आहेत. सोनवणेंनी 2019मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून बीड लोकसभेची निवडणूक लढवली होती.बीड लोकसभा मतदारसंघाबाबत उद्या शरद पवारांनी पुण्यात बैठक बोलावलीय. याच बैठकीत बजरंग सोनवणे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये यशवंत सेना पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. वेगवेगळ्या पक्षाकडून धनगर समाजाला केवळ आश्वासनांची खैरात वाटली जात आहे.प्रत्यक्षात कुठलाही लाभ दिला जात नाही. आरक्षण प्रश्नानंतर धनगर समाजाच्या विकासाचा प्रश्न देखील प्रलंबित असून याच प्रश्नावर बीड लोकसभेच्या मैदानात यशवंत सेनेचा उमेदवार उतरवण्याचा निर्धार बीड मधील बैठकीत करण्यात आला आहे.