संतप्त तरुणाने ईव्हीएम मशिनवरच चालवली कुऱ्हाड; VVPAT चे दोन तुकडे

0
15

नांदेड : देशात दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी आज मतदान (Voting) होत आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील जागांसाठी मतदानाचा हक्क बजावला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमधील बिघाड, किरकोळ वादाच्या घटना समोर येत आहेत. आता, नांदेड जिल्ह्यातून (Nanded) धक्कादायक घटना घडल्याचे दिसून आले. येथील एका मतदान केंद्रावर चक्क कुऱ्हाडीचा घाव घालून ईव्हीएम मशिनचे दोन तुकडे करण्यात आले आहेत. तर, मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घनटेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

नांदेडमध्ये मतदाराने आपला संताप व्यक्त करताना चक्क ईव्हीएम मशिन फोडलं, त्यावेळी कर्मचाऱ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर हा गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली.या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे तो ओरडत होता. त्यावेळी, मतदान केंद्रावर गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते, पण त्यांचाही नाईलाज झाल्याचे दिसून आले. या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण, कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.