१३ मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

बीड दि.29: 13 मे रोजी  बीड लोकसभा मतदारसंघात मतदान असून मतदान करण्यासाठी मतदार नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी मतदान जनजागृतीसाठी आयोजित सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून मतदारांमध्ये मतदानाचा जागर करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खर्च निरीक्षक सुशांत कुमार बिस्वास हे या मतदार जागृत सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते. आज बीड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा बीड, केज, माजलगाव, आष्टी, परळी, गेवराई या विधानसभा मतदार संघांमध्ये  ही सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीला मतदार नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

त्यापुढे म्हणाल्या, बीड लोकसभा मतदार संघातील जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा परिषद, पोलीस विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचारी असे जवळपास 15000  विविध शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी दिवस-रात्र निवडणुकीच्या विविध जबाबदारीचे वहन करीत आहेत. ही जबाबदारी मतदार नागरिकांनी मतदान करण्यासाठी पार पाडीत आहेत. मतदारांनी सोमवार दिनांक 13 मे रोजी घराबाहेर पडून मतदान करून मतदानाचा आपला हक्क बजवावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारतीय राज्यव्यवस्था न्यायपालिका, विधायिका, कार्यपालिका या तीन महत्त्वपूर्ण स्तंभांवर उभी असून कार्यपालिका म्हणून जिल्हा प्रशासन निवडणुकीचे काम चोख पार पाडत आहे. तर संसदेत पाठवण्याची जबाबदारी मतदारांची आहे मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन योग्य उमेदवार निवडून संसदेत पाठवावा आणि लोकशाही बळकट करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. मागील दोन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरल्याने बीडकरांनी मतदानात सक्रिय सहभागी होऊन बीडची जनता लोकशाही प्रिय आहे हे सिद्ध करून दाखवावे, असेही ते यावेळी म्हणाल्या.

सायकल रॅली ला पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला. सायकल रॅलीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, कार्यकारी अधिकारी नीता अंधारे, तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, स्विपचे नोडल अधिकारी, डॉ. विक्रम सारूक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, नायब तहसीलदार सुहास हजारे ,  यासह रोटरी क्लब, लायन्स क्लब, योगा क्लब, डॉक्टर सायकल संघटनेचे सदस्यांमध्ये महिलांची संख्या ही अधिक होती. कॉलेज, शाळेकरी  विद्यार्थी,  पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक न्याय भवन पासून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अन्ना भाऊसाठे चौक ते सुभाष रोड ते हिरालाल चौक ते बलभीम चौक ते बशीर गंज ते सिव्हिल हॉस्पिटल ते माने कॉप्लेक्स ते नाट्यगृह ते नगर नका ते भगवान बाबा चौक ते जिजामाता चौक ते डॉक्टर लाईन मार्गे शेवटी सामाजिक न्याय भवन असा सायकल रॅलीचा मार्ग होता.

‘मी मतदान करणार’ प्रतिज्ञा प्रमाणपत्र लिंक चे उद्घाटन

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी दोन तासात दैनिक मर्यादा पुर्ण

मतदार जागरुकता सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून ‘https://forms.gle/rCWv3M3Q1q8akfjn8‘ ही लिंक मतदार जागृतीच्या संदर्भात स्वीप विभागाने तयार केली आहे. या लिंकवर क्लिक करून जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदान जागृतीच्या नव्या उपक्रमाला आज सुरुवात केली.

बीड लोकसभा मतदारसंघात दिनांक 13 मे रोजी मतदान होणार असून  ‘मी मतदान करणार’ अशा आशयाची प्रतिज्ञा प्रमाणपत्राच्या स्वरूपात लिंक वर क्लिक केल्यावर प्राप्त केली जाऊ शकते. आज जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते या लिंकचे उद्घाटन झाल्यावर अवघ्या दोन तासात लिंक ची दैनिक मर्यादा पुर्ण झाली. दिवसभरात  1500 मतदार  ‘मी मतदान करणार’ असे प्रमाणपत्र प्राप्त करू शकतात. या लिंक वर क्लिक करून आपण जागरूक मतदार होऊ या, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी यावेळी केले. ‘मी मतदान करणार’ ही प्रतिज्ञा प्रमाणपत्र घेतल्यावर ते स्टेटसवर, व्हॉटसॲप डीपी तसेच अन्य समाज माध्यमांवर ठेवून आपल्या सहकाऱ्यांना नातेवाईकांना मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त करा, असेही ते यावेळी म्हणाल्या.

000000