परभणी, दि.28 : भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त समाज कल्याण कार्यालयात नुकतेच संविधान अमृत महोत्सवाचे अयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते तसेच समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गुठ्ठे व कार्यालय अधीक्षक बी.एल. स्वामी यांची उपस्थिती होती.
समाजातील प्रत्येकाने आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे अंगीकृत करून त्याचे पालन केले पाहिजे तसेच देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्याबद्दल आदराची भावना वाढविणे हा संविधानाचा मुख्य उद्देश आहे. भारतातील विविध जाती-धर्म आणि कोट्यवधी जनतेला एकत्रित करणारी ही राज्य घटना आहे. त्या राज्यघटनेचा गौरव करण्यासाठी आपण हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा करतो. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व आवश्यक कामासाठी ग्रामीण व शहरी भागातून आपल्या कार्यालयात येणारे नागरिक, विद्यार्थी यांना आपण सहकार्याची भावना ठेवून काम जलदगतीने कसे करता येईल, याचा प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक असल्याचे उपायुक्त श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
तसेच सहाय्यक आयुक्त श्रीमती गुठ्ठे यांनीही मनोगत व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत कार्यरत सर्व अनुसूचित जाती मुला/मुलींची शासकीय निवासी शाळा व मागासवर्गीय वसतिगृह येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, मान्यवरांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रमाचे अयोजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय व सर्व महामंडळ येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व इतर नागरिक उपस्थित होते. सहाय्यक शिक्षक श्री. भुसारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.