परभणी, दि.28 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहिता काळात जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्तमरितीने जबाबदारी पार पाडत शांत, निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणूक यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता चव्हाण, उप विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर तसेच सर्व तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पथक प्रमुख उपस्थित होते.
राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांची अतिशय कमी वेळात प्रभावी अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने केली. तसेच आदर्श आचारसंहिता काळात सर्व पथक प्रमुखांनी चोख जबाबदारी पार पाडल्यामुळे जिल्ह्याचा विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्याबद्दलही कौतुक केले. निवडणूक आयोगाने वेळोवेळी केलेल्या सूचना आणि निर्देशानुसार जबाबदारी पार पाडल्यामुळे ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली असल्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निवडणूक कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आणि सर्व पथक प्रमुखांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले तसेच भविष्यातही उत्तम कामगिरी पार पाडण्याच्या शुभेच्छा दिल्या.
अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी यावेळी विभागीय आयुक्त श्री. गावडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. तर निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी विभागीय आयुक्तांचे आभार मानले.
*-*-*-*-*