• सैनिक व कुटुंबियांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ध्वजदिन निधीत योगदान देणेचे आवाहन
परभणी, दि. 10 : देशाचे रक्षण करणारे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधी संकलन-2024 चा शुभारंभ आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाला. देशाच्या सुरक्षेसाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती आपण सर्व कृतज्ञ आहोत. त्यामुळे सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधी संकलनात योगदान देणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, तरी प्रत्येकाने ध्वजदिन निधी संकलनात आपले योगदान अवश्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक अधिकारी अनुराधा ढालकरी, मनपा आयु्क्त धैर्यशिल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोंसीकर, शिक्षणाधिकारी आशा गरुड, तहसिलदार संदिप राजपुरे आदींसह माजी सैनिक, सैनिकांचे कुटुंबिय व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकरी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध विभागांची लवकरच बैठक घेण्यात येईल. ध्वजदिन निधी संकलनासाठी दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी विभागप्रमुखांना केली.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी परभणी जिल्ह्यातील शहीद झालेल्या सैनिकांच्या वीर पत्नी व वीर माता-पिता यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांसाठी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या कल्याणकारी निधीमधून सात विदयार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व शिष्यवृत्तीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ध्वजदिन निधी संकलन-2023 चे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले. तर उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.