धाराशिव- जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच असून, त्यांच्यावर हा हल्ला तुळजापूरमधील बारुळ गावानजीक झाला. गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सरपंचाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र त्यांच्या या घटनेने कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर आता धाराशिव जिल्ह्यातही सरपंचावर हल्ला झाल्याने स्थानिक समुदायात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेमुळे ग्रामीण क्षेत्रातील नेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
मात्र नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली आहे आणि हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच सरपंच नामदेव निकम यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.