राष्ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा
परभणी, दि. 25 : – भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसिलदार संदीप राजापुरे, गटविकास अधिकारी दीपा बापट आदींसह अन्य अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मतदार जनजागृतीवर विद्यार्थ्यांनी काढलेल्या सुंदर चित्रांच्या चित्रदालनाचे मान्यवरांनी उदघाटन केले. जिल्हाधिकारी यांनी सर्व उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली. यानंतर अरविंद शहाणे, मोहन अल्हाट, शिवाजी कांबळे यांच्या संचाने “करा तुम्ही मतदान, जन हो करा तुम्ही मतदान” हे मतदार जागृतीपर गीत सादर केले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने यशस्वीपणे केलेल्या निवडणूक प्रक्रियेवर आधारीत व्हीडीओ चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी आपल्या भाषणात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्हयातील सुजान मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला, याबद्दल आभार मानले. या निवडणुका अतिशय पारदर्शक पध्दतीने व शांततेत पार पडल्याचे सांगून त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत माहिती दिली. हे यंत्र कुठल्याही प्रकारे हॅक करता येत नाही. तसेच या यंत्रासोबत असणाऱ्या व्हीव्हीपॅटमुळे मतदारांना आपण कोणाला मतदान केले. हे चिठ्ठीवरुन दिसते. त्यामुळे मतदान यंत्राबाबत कुठलीही शंका बाळगू नये, असे स्पष्ट करुन मतदारांनी भविष्यात होणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन केले.
श्री. जाधव यांनी एक मतही किती महत्त्वपूर्ण असते हे एका प्रसंगाचा दाखल देऊन स्पष्ट केले. तर प्रास्ताविकात श्री. विधाते यांनी राष्ट्रीय मतदार दिनाबाबत सविस्तर माहिती दिली. आभार श्री. शेवाळे यांनी मानले. तर सूत्रसंचलन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.
मतदार दिनाच्या अनुषंगाने शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा, स्वीप अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांचा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत यशस्वीपणे कार्य करणारे नोडल अधिकारी, सहायक कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम रेंगे, तालुका अध्यक्ष तावजी हरकळ, महिला तालुका अध्यक्ष राजश्री कच्छवे, तालुका सचिव सचिन सूर्यवंशी, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद रन्हेर यांचाही सत्कार करण्यात आला.
“घर घर संविधान” रॅली —-
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात “घर घर संविधान” कार्यक्रमातंर्गत काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या रॅलीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.