ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हाच घडू नये,या दृष्टीने काम केले पाहिजे-वैभव गीते

0
27
*ॲट्रॉसिटी प्रशिक्षण कार्यशाळा*
धाराशिव दि २९-  समाजातील जातीय भेदभाव हा नष्ट झाला पाहिजे. जातीच्या कारणांवरून कोणताही विवाद होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत अर्थात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे घडू नये या दृष्टीने काम केले पाहिजे.असे विचार नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गीते यांनी व्यक्त केले.
आज २८ जानेवारी रोजी तुळजापूर येथील टाटा समाज विज्ञान संस्थेत आयोजित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ या विषयावर धाराशिव लातूर व सोलापूर जिल्ह्यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी विशेष अतिथी म्हणून श्री. गीते बोलत होते.अध्यक्षस्थानी टाटा विज्ञान संस्थेचे संचालक प्रा.बाळ राक्षसे होते.प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपयुक्त अविनाश देवसटवार,बार्टीच्या उपायुक्त तथा विभाग प्रमुख वृषाली शिंदे,उपविभागीय अधिकारी श्री.पाटील श्री.पवार व श्रीमती पाटील तसेच चारही उपविभागीय पोलीस अधिकारी,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत (धाराशिव), श्रीमती सुलोचना सोनवणे (सोलापूर), शिवकांत शिकूर्ते (लातूर),टाटा विज्ञान संस्थेचे प्रा रमेश झारे,बार्टीचे ॲट्रॉसिटी कायद्याचे प्रशिक्षक सुभाष केकान यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.गीते पुढे म्हणाले की,या कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या असल्या पाहिजे हे बघितले पाहिजे.या कायद्याअंतर्गत गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.गोपनीयता बाळगली तर लोक साक्ष द्यायला पुढे येतील.गावाच्या पोलीस पाटलांनी या गुन्ह्याबाबतची वस्तूनिष्ठ माहिती तालुका दंडाधिकारी यांना देणे गरजेचे आहे.तपास अधिकाऱ्यांवर फिर्यादीचा विश्वास नसेल तर त्याने मागणी केलेल्या अर्जानुसार तपास अधिकारी बदलून दिला पाहिजे.तपासाचे बारकावे पोलीस अधिकाऱ्यांना माहीत असले पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने ॲट्रॉसिटी कायद्यावर एक परिपूर्ण पुस्तक तयार करावे म्हणजे त्याचा उपयोग विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना होणार असल्याचे श्री. गीते यांनी सांगितले.
ॲट्रॉसिटी कायदा हा जातीवाचक शिवीगाळ पुरता मर्यादित नसल्याचे सांगून श्री.गीते म्हणाले,हा कायदा अपमानित करण्यासंदर्भात आहे.या कायद्याबाबतचे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे.ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमाअंतर्गत असलेल्या तरतूदी पोलीस अधिकाऱ्यांनी व्यवस्थित वाचून या कायद्याबाबतची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली पाहिजे. व्यापक प्रमाणात ॲट्रॉसिटी कायद्याची जनजागृती होणे गरजेचे आहे.या कायद्याअंतर्गत अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.फिर्यादीला न्याय मिळवून देणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.पिडितांना या कायद्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली पाहिजे.या कायद्याशी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या या कायद्याबाबतच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त असल्याचे श्री.गीते म्हणाले.
अध्यक्ष म्हणून बोलताना प्रा.श्री राक्षसे म्हणाले,ॲट्रॉसिटीबाबत नोकरशाहीमध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसतो.कायदे करून किंवा कायदे लागू करून उपयोग होणार नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. बंधुता असेल तर ॲट्रॉसिटीचे गुन्हे घडणार नाही असे त्यांनी सांगितले.
सरकारी वकील पाटील म्हणाले,ॲट्रॉसिटी कायदा हा अत्यंत प्रभावी आहे.या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.फिर्यादीला या कायद्यांतर्गत न्याय दिला पाहिजे.शिक्षेच्या दृष्टीने नाही तर न्यायाच्या भूमिकेतून सरकारी वकील काम करत असतात.कोणतेही न्यायालयीन काम हे टीमवर्क म्हणून केले जाते.
प्रा.झारे म्हणाले,जिल्ह्यात ॲट्रॉसिटीची प्रकरणे का वाढत आहे,त्याचे संशोधन करण्यात येत आहे.या कायद्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.आरोपींना शिक्षा तर पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक गावात ॲट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृती झाली पाहिजे.त्यामुळेच ॲट्रॉसिटीचे गुन्हे कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.केकान म्हणाले,शासकीय व्यवस्थेची धडपड ही समाजाच्या सर्वांगीण विकासाची आहे. गुन्हे घडण्याची कारणे आपल्याला शोधायची आहे.अन्याय करणारा आणि अत्याचारग्रस्ताच्या मानसिकतेचा देखील अभ्यास करायचा आहे.सामाजिक व राजकीय घटनांचे होणारे परिणाम तसेच काही खोटे गुन्हे दाखल होतात का हे अभ्यासातून या कायद्याबाबत समाज आणि शासनापुढे सादर करावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्या सत्रात या कायद्यावर उपस्थित मान्यवरांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. दुपारच्या सत्रात ॲट्रॉसिटी कायद्याशी संबंधित विविध बाबींवर सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी यांचे स्वतंत्र गट तयार करून गटचर्चा करण्यात आली.
कार्यशाळेला धाराशिव,लातूर व सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कार्यशाळेचे प्रास्ताविक बार्टीचे नितीन शहाडे यांनी केले.कार्यशाळा घेण्यामागची भूमिका बार्टीच्या उपायुक्त तथा विभाग प्रमुख श्रीमती वृषाली शिंदे यांनी विशद केली.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.गजानन हिवाळे यांनी मानले.