धाराशिव,दि.१५ फेब्रुवारी- जिल्ह्यात ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ग्रामीण व शहरी जोखीमग्रस्त भागात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक १२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दाखल झाले.
केंद्रीय पथकात भारत सरकारच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ.सुधीर वंजे आणि विशेष तज्ञ डॉ. सपना (CLTRI,चेंगलपट्टू) यांचा समावेश होता.तसेच राज्यस्तरीय आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. दिगंबर कानगुले आणि औद्योगिक पर्यवेक्षक श्री.मिलिंद तोडीवाले उपस्थित होते.
या पथकाने तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, तामलवाडी आणि मसला खुर्द येथे पाहणी केली.तसेच कळंब तालुक्यातील येरमाळा,चोराखळी, उपळाई,हासेगाव आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,कळंब येथे भेट देऊन मोहिमेच्या कार्यपद्धतीची तपासणी केली.
१३ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनय कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे यांची उपस्थिती होती.सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.मारुती कोरे यांनी मोहिमेचे सादरीकरण केले.
यानंतर,केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची भेट घेऊन मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले.