अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या विरोधात जनतेचा 4 तास रस्ता रोको आंदोलन
सडक अर्जुनी,दि.१५ :नागपूर -रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील बाम्हणी खडकी जवळ रस्ता बांधकामामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनीच्यावतीने एकेरी रस्ता सुरु ठेवल्याने यामार्गावर मोठे अपघात होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.आतापर्यंत तीन दिवसांमध्ये तिसरा अपघात शुक्रवारच्या सायकांळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास देवजीटोलाजवळ घडला.हा अपघात अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या निष्काळजीपणा व सुरक्षेच्या लापरवाहीमुळे घडला असून यात वडीलासह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवरीकडून कोहमाराकडे मोटारसायकलने येत असतांना रस्ता खोदून ठेवल्याने मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण बिघडले आणि भरधाव वेगात येणार्या बसने धडक दिल्याने या अपघातात बापलेकींचा मृत्यू झाला.या अपघातात वडील सूरजलाल वासाके (33) व सात वर्षीय चिमुकली वेदिका वासाकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.अपघातानंतर ब्राह्मणी खडकी परिसरातील जनतेने चार तास रस्ता बंद करून अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या विरोधात आंदोलन केले.जनतेने पोलीस प्रशासनासमोर अग्रवाल कंपनीच्या अधिकार्याना बोलवा तेव्हाच मृतदेह उचलू असा आग्रह धरत चार तास रस्ता अडवून ठेवला.दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून जनतेची समजूत घालून त्वरित अग्रवाल कंपनीने बंद केलेला रस्ता सुरु करुन दोन्ही मार्गाची वाहतूक मोकळी करुन दिली.