पुस्तके ही मानवी जीवनाचा प्रभावी उर्जास्त्रोत- जेष्ठ कवी केशव वसेकर

0
20
‘परभणी ग्रंथोत्सव’चे थाटात उद्घाटन’
• जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या प्रांगणात ग्रंथोत्सवाचे आयोजन
• पुस्तके खरेदीसाठी वाचकांची गर्दी
• ग्रंथदिंडीला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी, दि. 17 : पुस्तके ही माणसाला मानवी जीवनामध्ये उर्जा प्रदान करण्याचे काम करतात. पुस्तक वाचनामुळे माणूस बोलका होतो. जग बदल्याची शक्ती पुस्तकामध्ये असते. पुस्तके आणि ग्रंथ माणसाला निष्ठा, इमानदारीने जगण्याचे तत्व शिकवतात, त्यामुळे प्रत्येकाने वाचनसंस्कृती ही जोपासलीच पाहिजे, असे आवाहन जेष्ठ कवी केशव वसेकर यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने परभणी शहरातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित ‘परभणी ग्रंथोत्सव- 2024’ चे उद्घाटन आज सुप्रसिध्द जेष्ठ कवी केशव वसेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक ग्रंथालय संचालक (छत्रपती संभाजीनगर) सुनिल हुसे होते. यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बाळासाहेब देवणे, परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जिवन लोखंडे, कथाकार राजेंद्र गहाळ, केंद्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य राहूल नितनवरे, प्राचार्य रामेश्वर पवार उपस्थित होते.
श्री. वसेकर म्हणाले की, पुस्तक हे आपल्या मानवी जीवनाचे चार्जर असून ते माणसाला चार्ज करतात. पुस्तके मानवाच्या ज्ञानात भर घालतात. पुस्तकांमुळे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे माणसाला अन्यायाविरुध्द लढण्याची प्रेरणा मिळते. पुस्तके खांबावरील तारे सारखी असतात, जसे की तारांना स्पर्श केल्याशिवाय त्यामधील विजेच्या प्रवाहाची जाणीव होत नाही. त्याप्रमाणे पुस्तके वाचल्याशिवाय त्यांची शक्ती कळत नाही. पुस्तके माणसाला जगण्याची प्रेरणा देते. पुस्तके माणसाला बोलके करतात. तसेच मानसाला निष्ठा व इमानदारी शिकवतात. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून आजच्या मोबाईलच्या युगात वाचनसंस्कृती जोपासली जात आहे. त्याच लाभ सर्वांनी अवश्य घ्यावा.
उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात ग्रंथोत्सवासारखे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. सध्याच्या सोशल मिडीयाच्या युगात माणसाला ग्रंथाशिवाय पर्याय नाही. समाजात वाचन चळवळ वाढावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. हुसे म्हणाले की, वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे प्रत्येक जिल्ह्यात आयोजन करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धींगत करणे हा ग्रंथोत्सव आयोजनामागचा हेतू आहे. नव्या पिढीला मोबाईलच्या निरर्थक गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी ग्रंथांकडे वळविणे आवश्यक आहे. ग्रंथ जीवनाचे अविभाज्य अंग असून सर्वांनी अवांतर वाचन करावे.
प्राचार्य रामेश्वर पवार म्हणाले की, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी ग्रामीण भागातील वाचनालयाचा महत्वाचा सहभाग आहे. या माध्यमातून युवकांनी ज्ञान संपादन करुन आपले भविष्य उज्वल करावे. कथाकार राजेंद्र गहाळ यांनी ग्रंथालये ही वाचकांची ज्ञानाची भूक भागवत असतात. वाचन संस्कृती महत्वाची असून तरुण पिढींनी वाचनाकडे वळले पाहिजे.
प्रास्ताविक श्री. देवणे यांनी केले, राधाकिशन कदम यांनी आभार मानले. प्रारंभी ग्रंथ प्रदर्शन व विक्री दालनांचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या हस्ते झाले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रकाशनांच्या दालनांमध्ये विविध विषयांवरील ग्रंथ, पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उद्या मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत हे ग्रंथ प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, वाचन प्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रंथदिंडीला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. राजगोपालचारी उद्यान परिसरातून निघालेल्या या दिंडीचा समारोप जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे झाला. ग्रंथदींडीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते.