आब्दागिरे यांना १९ लाख दिले; तरीही निकाल प्रलंबित

0
464

जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील प्रकार ; विजय वरपूडकर यांचा आरोप

परभणी  : येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक संजय आब्दागिरे यांनी सोनपेठ तालुक्यातील विटा येथील शेतकरी शेख अजीमोद्दीन यांची जमीन सावकाराच्या ताब्यातून सोडवण्याचा निकाल देण्यासाठी १९ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतरही सदरील व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला नसल्याने आब्दागिरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे नेते विजय वरपूडकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

अतिथी हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेला माजी सभापती अजित वरपूडकर, अंकुश आवरगंड, बालासाहेब भांबट, मधुकर मोहिते, माजी सरपंच बाळासाहेब जावळे व पिडीत कुटुंबाची उपस्थिती होती.

पुढे बोलताना वरपूडकर म्हणाले की, मागील काही वर्षापासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सावकारी प्रकरणात कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी संगणमत करून शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केली आहे. विटा येथील शेख अजीमोद्दीन या शेतकर्‍याला मागील अनेक वर्षापासून सावकाराच्या ताब्यात असलेली तेरा एकर जमीन सोडवण्यासाठी जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधीक्षक संजय आब्दागिरे यांनी आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अशाप्रकारे अनेक शेतकर्‍यांना निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी पैशाची मागणी करून मोठ्या प्रमाणावर लाखोंनी पैसे उकळले आहेत. हे पैसे उकळण्यासाठी खाजगी व्यक्ती वैजनाथ जनार्दन गुंजकर व उत्तम रामा पवार या दोन व्यक्तीचा वापर करण्यात आला आहे. असा उल्लेख तक्रारीत देखील केला गेला आहे. याच पद्धतीने सोनपेठ तालुक्यातील सायखेडा तांडा येथील काही शेतकर्‍यांना देखील निकाल आपल्या आपल्या बाजूने देतो म्हणून त्यांची देखील आर्थिक फसवणूक केली आहे.

याच पद्धतीने अनेक शेतकर्‍यांना फसवण्यात आले आहे. त्यामुळे अब्दागिरे व अशा प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचारी आणि खाजगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाकडून देखील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास या प्रकरणात लवकरच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विजय वरपूडकर  यांनी शेवटी दिला. या संदर्भात आब्दागिरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.