लातूर-सार्वजनिक बांधकाम विभाग विभागातील अभियंत्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे त्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होईल. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.
नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी व लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने आयोजित रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. नाशिक येथील दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता कि. पं. पाटील, लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, विकास ठक्कर आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कृती कार्यक्रमांतर्गत विविध विभागांमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. नाविन्यता ही अभियंत्यांची खरी ओळख समजली जाते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी आपल्या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन कामामध्ये करून रस्ते, इमारतीची कामे अधिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करावीत. तसेच आपल्या कामात नाविन्यता आणावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. प्रशिक्षणात मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष कामात उपयोग होणे हे प्रशिक्षणाचे खरे फलित ठरेल, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसीय सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात रस्त्यांची विविध कामे सुरु आहेत. ही कामे अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागात पन्नासपेक्षा अधिक नवीन अभियंते रुजू झाले आहेत. या नवीन नियुक्त झालेल्या अभियंत्यांसह सध्या कार्यरत असलेल्या अभियंता वर्गासाठीही हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख म्हणाले.
नाशिक येथील दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांनी यावेळी प्रकल्प व्यवस्थापन या विषयवार सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्री. ठक्कर यांनीही यावेळी रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण कामाच्या अनुषंगाने विविध बाबींवर मार्गदर्शन केले.