सफाई कामगार ते फायरमन क्षेत्रातील महिलांचा ‘मान्विथा कर्मसिध्दी पुरस्काराने’सन्मान

0
21
लातूर,दि.०८ः वरिष्ठ पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाच्या कामगिरीचे श्रेय दिले जाते. मात्र, प्रशासनाच्या उतरंडीत तळाशी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल सहसा घेतली जात नाही. त्याचे स्वतंत्रपणे मूल्यमापन होत नाही. असाच अनुभव महिला दिनानिमित्त आयोजित अनेक कार्यक्रमात येतो. नेमकी हीच बाब हेरून, विविध विभागात प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘मान्विथा कर्मसिध्दी पुरस्कार वितरण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शहरातील स्वच्छता कर्मचारी, फायरमन ते ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य सेविका, आशा कर्मचारी अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयात रंगलेल्या या आगळ्यावेगळ्या कौतुक सोहळ्याला जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक महिला दिनाचा कौतुक सोहळा केवळ शीर्षस्थ पदावर काम करणाऱ्या महिलांपर्यंत मर्यादित राहू नये, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल यानिमित्ताने घेतली जावी, ही संकल्पना घेवून यंदा जिल्हा प्रशासनाने मान्विथा कर्मसिद्धी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. साचेबद्ध स्वरुपाला फाटा देत, कोणतेही व्याख्यान, भाषण न देता संवादात्मक स्वरूपाचा हा कार्यक्रम सर्वांसाठी उत्साहवर्धक ठरला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांची विवेक सौताडेकर यांनी घेतलेली प्रकट मुलाखत आणि त्यामध्ये उपस्थित महिलांनी नोंदविलेला सहभाग हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
जिल्हाधिकारी पदावर काम करणारी महिला प्रशासकीय जबाबदारी आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडताना कोणत्या आव्हानांना सामोरे जाते, यामध्ये कुटुंबाची साथ कितपत मिळते, असे विविध प्रश्न विचारात या महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रशासकीय प्रवास आणि या प्रवासात आलेले अनुभव जाणून घेतले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी आपल्या गेल्या सुमारे तीस वर्षातील प्रशासकीय सेवेतील अनुभवाचा पट उलगडला. एक महिला म्हणून प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना पती, कुटुंबाचे सदैव पाठबळ मिळाले, असे सांगून प्रत्येक महिला अधिकारी व कर्मचारी यांनी संसार आणि नोकरीचा समतोल साधताना, आपल्या आवडी-निवडी जोपासण्यासाठीही वेळ काढावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मुलाखतीतून महिला अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत काम करताना येणाऱ्या अनुभवाविषयी, तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये महिला आणि पुरुषांची भूमिका कशी असावी, याबाबत त्यांचे विचार जाणून घेतले.
कार्यक्रमाला उपस्थित महिलांमधून विविध कार्यालयांचे, क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन ते समारोप अशा प्रत्येक टप्प्यावर औपचारिकतेला बदल देत संवादात्मक स्वरुपात रंगलेला हा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येचा समारंभ सर्वच बाबत आगळावेगळा आणि संस्मरणीय ठरला. राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सफाई कामगार ते फायरमन सर्वच क्षेत्रातील महिलांचा सन्मान
शासकीय सेवेत गेली १० ते १५ वर्षांपासून समर्पण भावनेतून सफाई कामगार, आरोग्य सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत अधिकारी, अधिपरिचारिका, शिक्षिका, गृहपाल, फायरमन, शिपाई, पोलीस, अंगणवाडी सेविका, महसूल सहायक अशा पदावर काम करणाऱ्या महिलांना यावेळी मान्विथा कर्मसिद्धी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानचे हास्य दिसत होते.
पुरस्कार प्राप्त महिला खालीलप्रमाणे-
· महसूल विभाग- सुमन खंदाडे (सहायक महसूल अधिकारी), सुनिता ताटेपामुलवार (मंडळ अधिकारी).
· आरोग्य विभाग- डॉ. आरती बालाजी घोरुडे (वैद्यकीय अधिकारी), उषा सूर्यवंशी (आरोग्य सेविका), आरती सोनकांबळे (आरोग्य सेविका), विद्यावती जनार्धन सोनटक्के (आशा सेविका), प्रवीणा प्रभाकर पाटील (अधिपरिचारिका).
· जिल्हा परिषद- सुखदा सचिन देशमुख (ग्रामपंचायत अधिकारी), कल्पना गंगाराम हाके (ग्रामपंचायत अधिकारी).
· शिक्षण विभाग-सविता सतीश नरहरे (मुख्याध्यपिका), उर्मिला नागशेट्टी धनश्रे (मुख्याध्यापिका), महादेवी रामराव सूर्यवंशी (शिक्षिका), प्रभावती बाबुराव फड (शिक्षिका).
· समाज कल्याण विभाग- कविता धोंडबाराव सुकळकर (गृह प्रमुख), वर्षा रामराव चौधरी (गृहपाल).
· महानगरपालिका- तेजस्वी पाटील (फायरमन), उषा नामदेव काकडे (शाखा अभियंता), सुमन गायकवाड (आरोग्य सेविका), शोभा पाटील (शिक्षिका), सोजर अडसुळे (सफाई कामगार).
· महिला आर्थिक विकास महामंडळ- उषा अर्जुन डूमने (सीएमआरसी व्यवस्थापक), गुरुदेवी श्रीमंतप्पा येलुरे (उपजीविका समन्वयक).
· पोलीस प्रशासन विभाग- स्मिता दिलीपराव जाधव (पोलीस उपनिरीक्षक), सुरेखा माधवराव काळे (हेड कॉन्स्टेबल क्राईम अंमलदार), सुमित्रा केंद्रे (हेड कॉन्स्टेबल क्राईम अंमलदार).
· महिला व बालविकास विभाग- प्रज्ञा राजेंद्र तोंडगिरे (संरक्षण अधिकारी), सुवर्ण जाधव (समुपदेशक), अरुणा बाबुराव सूर्यवंशी (अंगणवाडी पर्यवेक्षिका), केराबाई लक्ष्मण जाधव (अंगणवाडी पर्यवेक्षिका).
· क्रीडा विभाग- सारिका काळे (तालुका क्रीडा अधिकारी), संपदा मोरे (शिपाई).
· सार्वजनिक बांधकाम विभाग- अनिता बाळासाहेब कटके (कनिष्ठ अभियंता), अनिता पाटील (उपविभागीय अभियंता)
· विशेष गौरव- डॉ. क्रांती सातपुते (प्राचार्य, दयानंद फार्मसी माविद्यालय), मनिषा काथवटे (शिक्षिका, केशवराज विद्यालय).