‘माविम’च्या नवतेजस्विनी महोत्सवाचे थाटात उद्घाटन

0
10
• पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली
महिला बचत गटांनी उत्पादित केल्या वस्तूंची खरेदी
• महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनिनिमित्त आयोजन

>लातूर<-जागतिक महिला दिन आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या नवतेजस्विनी महोत्सवाचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या अधिकाऱ्यांनी बचतगटांच्या दालनांमध्ये जावून विविध वस्तूंची खरेदी करत या महोत्सवाचे उद्घाटन केले.

उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी कुटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महिलांना सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने गेल्या ५० वर्षात भरीव कामगिरी केली आहे. बचत गटांच्या चळवळ महिला सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरली असून यामाध्यमातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. या महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या बचत गटांची उत्पादने जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेत पाठविण्यासाठी प्रयत्न करावेत. माविमच्या माध्यमातून याबाबत महिलांना प्रशिक्षण दिले जावे, असे उपजिल्हाधिकारी श्रीमती गाठाळ यावेळी म्हणाल्या.
प्रारंभी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल यांनी प्रास्ताविकात नवतेजस्विनी महोत्सव आयोजनाचा हेतू विशद केला. तसेच माविमच्या गेल्या ५० वर्षातील वाटचालीची संक्षिप्त माहिती दिली. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले, दीपक टेकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परमेश्वर इंगळे, हितन कुऱ्हे, किरण तांदळे, अनंत हेरकर, सुजाता तोंडारे, मंगल वाघचौरे, उषा डूमने, सविता पाटील, विजयसिंग इंगळे, मंगेश थोरात, विजय लोंढे, प्रवीण जगताप, वर्षा राउत, दीपक चक्रे, जगदीश केनालवाड व सर्व सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले.
तीन दिवसीय प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल
८ ते १० मार्च या कालावधीत होत असलेल्या नवतेजस्विनी महोत्सवातील प्रदर्शनामध्ये बचत गटातील महिलांनी तयार केलेले घरगुती मसाले, शुद्ध हळद पावडर, विविध प्रकारचे पापड, विविध प्रकारचे लोणचे, शेवया, सांडगे, कुरुडी, लाल व काळे तिखट, हडोळाती चे प्रसिद्ध काळे तिखट, घाण्याचे करडी व सूर्यफूल तेल, खोबर तेल, विविध दुग्धजन्य पदार्थ – खवा, पेडा बासुंदी, पनीर व तूप, कडक ज्वारी व बाजरी ची भाकरी, सोलापुरी शेंगदाना चटणी, लाडू,चिवडा, विविध प्रकारच्या डाळी, जात्यावर तयार केलेल्या डाळी, गहू, मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त पिवळी ज्वारी, जवसाची चटणी, तीळ, दुरडी, झाडू, खराटा, फडा, रुखवताचे सामान, लोकरीचे पडदे, मायक्रॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, स्कार्प, पडदे, गारमेन्ट, विणकाम, कपड्याच्या बॅग, टिफिन बॅग, सौदर्य प्रसाधणे, परफ्यूम इत्यादीचे तसेच विविध स्टॉल असणार आहेत.
उत्कृष्ट महिला उद्योजिकांचा सत्कार
महिला बचत गटांतील उत्कृष्ट महिला उद्योजिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये मीरा धनंजय कासले (रेणापूर), कोमल लकडे (बोरवटी), जयश्री शैलेन्द्र धुमाळ (आशिव), सुजाता उमाशंकर खोबरे (वरवंटी), रेखा बाबासाहेब गोरे (गाधवड), नंदा राजकुमार गोरगिळे (उमरगा कोर्ट) यांचा समावेश होता. तसेच उत्कृष्ट समुदाय साधन व्यक्ती म्हणून महानंदा गायकवाड (भादा), निकिता परमेश्वर देशमुख (घनसरगाव), सुनिता रविकांत शेळके (सोनवती), मंगल रामहरी सुरवसे (भोयरा), अर्चना सोमनाथ बाळापुरे (महादेव नगर), उर्मिला बाबाराव चोबळे (चोबळी) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
बचत गटातील सक्रीय सदस्य आणि सरपंच म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या तावशी ताड येथील सरपंच रमा कांबळे आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुनिता श्रावण खरात (लखनगाव) यांचाही यावेळी कायदासाथी म्हणून गौरव करण्यात आला.
लोकसंचलित साधन केंद्राचा गौरव
महिला बचत गटाची चळवळ चिरकाल टिकण्यासाठी बचत गटांना व गटातील महिलांना त्यांच्या आवश्यकते गरजेनुसार सेवा उपलब्ध करून देणे, महिलांना संघटीत करून त्यांना सक्षम बनविण्यामध्ये लोकसंचलित साधन केंद्राचा खूप मोठा वाटा आहे. महिलांच्या सर्वागीण विकासासाठी लोकसंचलीत साधन केंद्र कार्यकरीत आहे. यापैकी लातूर येथील एकता लोकसंचलीत साधन केंद्र, जयहिंद लोकसंचलीत साधन केंद्र, औसा येथील झाशीची राणी लोकसंचलीत साधन केंद्र, रेणापूर येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलीत साधन केंद्र, मुरुड येथील प्रगती लोकसंचलीत साधन केंद्र, शिरूर ताजबंद येथील तेजस्विनी लोकसंचलीत साधन केंद्र केंद्राचा यावेळी गौरव करण्यात आला.
महिला बचत गटांना बँक कर्ज वितरण
बँकांमार्फत महिला बचत गटांना मंजूर करण्यात आलेल्या कर्जाचे यावेळी वितरण करण्यात आले. यामध्ये आयसीआयसीआय बँकेने ८७ बचत गटांना ३ कोटी ८७ लाख ८२ हजार रुपये, तर एचडीएफसी बँकेने १९ बचत गटांना ७९ लाख ७१ हजार रुपये कर्ज वितरीत केले. वैयक्तिक कर्ज योजनेतून आयसीआयसीआय बँकेने किराणा दुकान व्यवसायसाठी महिला बचत गटाच्या अंजली दयानंद कांबळे यांना ४ लाख रुपये कर्ज वितरीत केले आहे.