व्यापाऱ्यांच्या बहिष्काराने ‘एपीएमसी’ ठप्प

0
12

गोंदिया: शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत घेण्याचा पणन संचालकांचा आदेश सहकारमंत्र्यांनी तूर्त स्थगित केला असला तरी तो आदेश पूर्णपणे रद्द करावा, यासाठी गोंदियातील व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदीस नकार दिला. यासाठी व्यापाऱ्यांनी सोमवारी व मंगळवारी येथील बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवले. यामुळे दोन दिवसात एक कोटींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेल्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अडते (दलाल) हे महत्वाची भूमिका निभावतात. अडते शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळवून तर देतातच शिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम रोख स्वरूपात देतात. या मोबदल्यात येथे तीन टक्के अडत (दलाली) घेतली जाते. मागील कित्येक वर्षांपासून याच स्वरूपात हे व्यवहार सुरू असून यामुळे शेतकरी, व्यापारी व अडते तिन्ही पक्ष समाधानी होते. मात्र राज्याच्या पणन संचालकांनी शेतकऱ्यांची वर्तमान स्थिती बघता आता अडत शेतकऱ्यांकडून न घेता व्यापाऱ्यांकडून घेण्याचे आदेश २० डिसेंबर रोजी काढले. यावर गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीने २२ डिसेंबर रोजी सर्व संचालकांची बैठक घेऊन याबाबत व्यापाऱ्यांना बोलावून माहिती दिली. मात्र व्यापाऱ्यांनी हा प्रकार आपल्यावरील अन्याय असल्याचे सांगत लगेच व्यवहार बंद पाडले.

दरम्यान पणनमंत्र्यांनी त्या आदेशाला स्थगिती दिली. मात्र आदेशावर स्थगिती न देता तो पूर्णत: रद्द करून बाजार समितीतील व्यवहार पूर्वीप्रमाणेच राहू देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. आपल्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी मंगळवारीही (दि.२३) बाजार समितीत व्यवहार बंदच ठेवले.

यामुळे मात्र शेतकऱ्यांना बाजार समितीतून आल्यापावली परत जावे लागले.

शिवाय व्यापाऱ्यांनी धान खरेदीस नकार दिल्याने शेतकऱ्यांसह शासनाचेही नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीतील आडतिया व्यापारी संघाचे अध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, प्रमोद अग्रवाल, संचालक सुरेश अग्रवाल, निर्मल अग्रवाल, संतोष कायते, नवीन रायली, गिरधारी तांबी, मैनुद्दीन तिगाला आदी अडत्यांनी व्यक्त केली.