ऑस्ट्रेलियात अदानींच्या प्रकल्पांवर कायदेशीर आक्षेप

0
22

वृत्तसंस्था
सिडनी- ऑस्ट्रेलियातील एका पर्यावरणवादी गटाने उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायजेसच्या सुमारे ४३३० कोटी डॉलर किमतीच्या कार्मिकेल कोळसा खाण प्रकल्पाला कायदेशीर आव्हान दिले आहे.

गलिली बेसिन येथे हा प्रकल्प असून, या आक्षेपांनंतर क्वीन्सलँड राज्यातील निवडणुकांच्या प्रचारामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. क्वीन्सलँडचे प्रमुख कँपबेल न्यूमन यांनी आपल्याला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करताना गलिली बेसिनचा विकास हा महत्त्वाचा प्रचाराचा मुद्दा मांडला आहे.

पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या केंद्र सरकारच्या धोरणाला साह्यकारी म्हणून कँपबेल यांनी गलिली बेसिनच्या विकासाचा मुद्दा प्रचारामध्ये प्रमुख केला आहे.
अदानींच्या प्रकल्पाला राज्य आणि केंद्र सरकारचा पाठिंबा असला तरी पर्यावरणवादी गटांनी त्यावर आक्षेप घेतले आहेत. याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या कायदेशीर आक्षेपांमध्ये आणखी भर पडली आहे. तसेच, या प्रकल्पांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होऊन ग्रेट बॅरियर रीफ येथील जल पर्यटनाला धोका निर्माण होईल अशी भीती पर्यटन व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.