नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकपर्व’; काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल

0
9
नांदेड(विशेष प्रतिनिधी),दि.12- नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेसने मुसंडी मारत प्रचंड बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. राज्यातील भाजपच्या विजयाची घौडदौडीला लगाम लावण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना यश आले आहे. चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने 81 जागांपैकी 58 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला केवळ 2 जागेवर आघाडी घेता आली आहे. शिवसेना 1 जागांवर आघाडीवर आहे.
राष्ट्रवादी आणि एमआयएमने अद्याप खाते खोलले नाही.एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांची आई जकीया बेगम यांना प्रभाग क्रं. 14 मधून पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसच्या उमेदवार शबाना बेगम यांनी जकीया बेगम यांचा 250 मतांनी पराभव केला.
दुसरीकडे, नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेने खाते उघडले आहे. तरोडा खु.मधून शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर विजयी झाले आहे. तसेच भाजपच्या उमेदवार शांता गोरे कौठा प्रभागातून निवडून आल्या आहेत.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नांदेड महापालिकेत खातेही खोलता आलेले नाही. त्यामुळे नांदेडकरांनी सेना- राष्ट्रवादीचे पानीपत केल्याचे चित्र आहे.
दरम्यान, नांदेड महापालिकेसाठी काल (बुधवारी) 60 टक्के मतदान झाले होते. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत 578 उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत. यंदा मात्र, काँग्रेससमोर भाजपसह एमआयएमचे कडवे आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमआयएमच्या ओवेसी बंधूंच्या सभा झाल्या होत्या. दुसरीकडे नांदेड महापालिकेवर भगवा फडकेल, अस दावा शिवसेनेने केला होता.

– खालच्या पातळीवरच्या प्रचाराला उत्तर मिळाल्याची जोरदार टीका अशोक चव्हाण यांची भाजपवर केली आहे.
– अशोक चव्हाण म्हणाले, विकासाच्या मुद्द्यांला जनतेने पाठिंबा दिला… नांदेडकरांचे आभार

अशोक चव्हाणांनी गड राखला-

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची या निकालाच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली होती. मोदी लाटेतही खासदार म्हणून निवडून आलेल्या अशोक चव्हाण यांनी मात्र आज पुन्हा एकदा नांदेड महापालिकेच्या निकालाच्या निमित्ताने आपली ताकत दाखवून दिली आहे. अशोक चव्हाण यांनी व्यूहरचना आखीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड दिला आहे. एमआयएम, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा फायदा काँग्रेसला झाला आहे.
मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड,एमआयएमचा सुपडा साफ
भाजपने नांदेड महापालिकेसाठी काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे लोक आपल्या पक्षात घेत बेरजेचे राजकारण केले आहे. मात्र, त्याला नांदेडकरांनी बिलकूल प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. यासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर-पाटील यांना फोडले. सोबत मराठा कार्ड खेळत संभाजी निलंगेकर यांच्याद्वारे तेथे रसद पोहचवली. मात्र, नांदेडकरांनी त्यांना थारा दिला नाही.एमआयएमने 2012 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 12 टक्के मते घेतली होती. तसेच त्यांचे त्यावेळी 12 नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र, तेथील मुस्लिम मतदारांनी एमआएमलाही साफ नाकारल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत औवेसी बंधूंनी चार दिवस नांदेडमध्ये तळ ठोकला होता. मात्र, त्याचा काहीही फायदा त्यांच्या पक्षाला झालेला दिसत नाही.