विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा गौरव व सन्मान

0
12

नांदेड दि. 20 -पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने विभागस्तर व जिल्हास्तरावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्याला पहिल्यांदाच तीनही पुरस्कार मिळाले आहेत. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. तुकाराम मोटे, तालुका कृषी अधिकारी कंधार संजय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी लोहा विश्वांभर मंगनाळे, तालुका कृषी अधिकारी भोकर रमेश देशमुख यांचा विशेष सत्कार व सन्मान, गौरव शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, इंजि. शे.रा. पाटील, जिल्हाध्यक्ष सोपान क्षीरसागर ,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष संतोष गव्हाणे, छावा क्रांतीवीर सेनाचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, पंचायत समिती सदस्य बालाजी सूर्यवंशी, संयोजक तथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परीषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजनेमध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकारी यांचा विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीचा पुरस्कार बेंबर ता.भोकर, लोहा, कंधार या तालुक्यास मिळाला आहे. याच अनुषंगाने सत्कार व सन्मान गौरवाचे आयोजन केले होते.
प्रास्ताविकात संयोजक भागवत देवसरकर यांनी जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यामध्ये कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेऊन राबवली आहे. त्यामुळे एवढे यश मिळाले आहे. कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव व सन्मान वेळोवेळी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. तुकाराम मोटे यांनी जलयुक्त शिवार योजनेमध्ये लोक सहभाग वाढला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत तरूणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे मत व्यक्त केले. भविष्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे लोकचळवळीव्दारे झाली पाहिजे, त्यामुळे कामांची गती वाढेल. याचा फायदा निश्चित जमिनीतील पाणीपातळी वाढण्यासाठी होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कामाजी पवार यांनी कृषी अधिकारी यांनी जलयुक्त शिवार योजनेत केलेल्या कामांची दखल घेऊन त्यांचे कौतुक केले. या कामामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांस मोठा फायदाच होईल. शेतकऱ्यांना जमिनीस मुबलक पाणी मिळाल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. या कामी सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वांनी सहभागी व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना संतोष गव्हाणे पाटील, तालुका कृषी अधिकारी विश्वभंर मंगनाळे, गायकवाड साहेब यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत कदम तर आभार प्रदर्शन दीपक पवार वडगावकर यांनी मानले. कार्यक्रमास महानगर अध्यक्ष परमेश्वर काळे, प्रशांत आबादार, सतीश जाधव, परमेश्वर उन्हाळे दांडेगावकर, सुनील ताकतोडे, अनिल देवसरकर, परसराम कवडे, गजानन पाटील नागेलीकर, विजय ताटे, प्रदीप देशमुख, अनिल कंरडे यांच्यासह कृषी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.