दिलीप संघवी झाले भारताचे कुबेर!

0
5

मुंबई : रिलायन्स इन्डस्ट्रीजच्या मुकेश अंबानी यांना मागे टाकत सन फार्माचे प्रवर्तक दिलीप संंघवी यांनी भारतातील सर्वात धनाढ्य व्यक्तीचे स्थान पटकावले, असे चित्र गुरुवारी समोर आले. या दोन्ही उद्योगसमूहांतील कंपन्यांत प्रवर्तकांकडील शेअर्सच्या बाजारमूल्याचा विचार केला, तर संंघवी हे अंबानी यांच्यापेक्षा श्रीमंंत ठरतात.

गुजरातमध्ये जन्मलेल्या आणि कोलकात्यात शिक्षण घेतलेल्या ५९ वर्षांच्या संंघवी यांच्याकडे सन फर्मा उद्योगसमूहातील सन फर्मा, सन फर्मा अ‍ॅडव्हान्स्ड रीसर्च आणि रॅनबक्शी लॅब्स या तीन कंपन्यांचे ६३ टक्क्यांहून अधिक भागभांडवल आहे. मुंबई शेअर बाजार गुरुवारी सायंकाळी बंद होताना या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्सचे जे भाव होते ते विचारात घेतले तर संघवी यांच्याकडील शेअर्सचे मूल्य १.४६ लाख कोटी रुपये एवढे होते. (डॉलरचा विनिमय दर ६२.३४ रुपये धरला तर डॉलरमध्ये हे मूल्य २३.४२ अब्ज अमेरिकी डॉलर होते). या तुलनेत ५७ वर्षांच्या मुकेश अंबानी यांच्याकडे रिलायन्स समुहातील रिलायन्स इन्डस्ट्रिज आणि रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांचे ४५ टक्के भागभांडवल प्रवर्तक या नात्याने आहे. मुंबई शेअर बाजाराने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी बाजार बंद होताना अंबानी यांच्याकडील उपर्युक्त शेअर्सचे बाजारमूल्य १.३२ लाख कोटी (२१.२ अब्ज डॉलर)एवढे होते. म्हणजेच गुरुवारअखेर दिलिप सिंघवी मुकेश अंबानी यांच्याहून अधिक क्षीमंत होते.

याखेरीज पवनऊर्जा उद्योगातील आघाडीच्या सुझलॉन कंपनीचे २३ टक्के भागभांडवल संघवी व त्यांचे कुटुंबिय विकत घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. सनफार्मा समुहातील कंपन्यांच्या जोडीला सुझलॉनच्या शेअर्सचे बाजारमूल्यही विचारात घेतले तर संंघवी यांची मालमत्ता १.४८ लाख कोटी रुपयांच्या घरात जाते. (२३.७ अब्ज डॉलर). असे असले तरी ब्लूूमबर्गच्या जागतिक अब्जाधीशांच्या क्रमवारीत अजूनही रिलायन्स इन्डस्ट्रिजचे ‘बॉस’ मुकेश अंबानी हेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या आणि संंघवी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्गनुसार अंबानी यांची नक्त मालमत्ता २१.९ अब्ज डॉलर तर संघवी यांची १९.७ अब्ज डॉलर आहे. त्यांच्या क्रमवारीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अंबानी यांचा ३३ वा क्रमांक लागतो.

गेल्या वर्षभरात बाजारात सन फार्माच्या शेअर्सचे भाव ५० टक्क्यांनी वाढून ती भारतातील सर्वात मूल्यवान व जगातील पाचव्या क्रमांकाची मूल्यवान कंपनी झाली आहे. अशा प्रकारे १९८२ मध्ये १० हजार रुपयांच्या भांडवलाने सन फर्मा कंपनी स्थापन करणारे संघवी जगातील औषध कंपनीचे सर्वात श्रीमंत मालक झाले आहेत. रॅनबक्शी लॅब्ज ही कंपनी मूळ जपानी मालकांकडून विकत घेतल्याने आणि सन फर्मा अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च या कंपनीचीही चांगलीच भरभराट झाल्याने संंघवी यांच्या श्रीमंतीत आणखीनच भर पडली आहे. सन फर्मा अ‍ॅडव्हान्स्ड ही सन फर्मा उद्योगसमुहाची संशोधन व विकासाचे काम करणारी प्रमुख कंपनी असून दोन वर्षांपूर्वी ती मुख्य कंपनीपासून वेगळी करण्यात आली.

गेल्या महिनाभरात सन फर्माच्या शेअरचे भाव सुमारे ५ टक्क्यांनी वाढून सध्याच्या ९१८ रुपयांवर पोहोचले आहेत. सन फर्मा अ‍ॅडव्हान्स्डच्या शेअरमध्येही ५० टक्क्यांनी तेजी येऊन त्याचा दर ३७४ रुपये झाला. रॅनबक्शीच्या शेअरचा भावही १० टक्क्यांनी वाढून ७०९ रुपयांवर पोहोचला आहे. या तेजीमुळे संघवी यांची मालमत्ता चढत्या भाजणीने वाढत गेली आहे.याच काळात रिलायन्स इन्डस्ट्रिजचे शेअर सुमारे ३ टक्क्यांनी वधारले तर रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्राचे शेअर थोडेसे घसरले.