गृहकर्जाच्या दरात SBI देणार पर्सनल लोन

0
15

मुंबई-तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज घेतलं असेल आणि त्याचे हप्तेही वळेवर भरले असतील, तर तुमच्यासाठी एसबीआयची एक बंपर ऑफर आहे. आपल्या गृहकर्ज ग्राहकांना गृहकर्जाच्याच व्याजदरात, म्हणजेच १०.१५ टक्क्यांनी पर्सनल आणि टॉप अप लोन देण्याची योजना एसबीआयनं आखली आहे. अर्थात, ही ऑफर काही काळापुरतीच मर्यादित आहे.

देशातील सगळ्यात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं आपल्या लाखो खातेदारांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. इतर बँकाच्या तुलनेत एसबीआयचं गृहकर्ज स्वस्तात मिळतं. अर्थात, ते मिळवणं अजिबातच सोपं नाही. पण एकदा कर्ज मिळाल्यावर त्या व्यक्तीची काळजी मिटून जाते. एसबीआयच्या अशा लाखो गृहकर्ज ग्राहकांना आता बँकेनं आणखी दिलासा द्यायचं ठरवलंय. चांगला ‘ट्रॅक रेकॉर्ड’ असलेल्या ग्राहकांना थोडा फायदा व्हावा, त्यांनी एसबीआयसोबतच राहावं आणि त्याद्वारे कर्जदारांची संख्या वाढून बँकेलाही लाभ व्हावा, या उद्देशानं टॉप-अप लोनचे व्याजदर बँकेनं कमी केले आहेत.

स्टेट बँकेचं पर्सनल लोन आज १३.५ ते १८.५ टक्क्यांनी मिळतं. परंतु, बँकेच्या गृहकर्जधारकांना आणखी कर्ज हवं असल्यास ते आता १०.१५ टक्क्यांनीच मिळू शकणार आहे. महिलांसाठी हा व्याजदर १०.१० टक्केच असेल. सध्या टॉप-अप लोनसाठी बँक ०.३५ ते ०.४० टक्के अधिक व्याज घेते. त्यांच्या या नव्या ऑफरचा ग्राहकांना आणि बँकेलाही चांगलाच फायदा होईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं यावर्षी दोन वेळा रेपो रेट कमी करूनही बँकांनी व्याजदर कमी केलेले नाहीत. व्याजदर कमी केल्यास आपल्याला फटका बसू शकतो, असं सागून त्यांनी बेस रेट १० ते १०.२५ टक्केच ठेवलाय. असं असताना, स्टेट बँकेची बंपर ऑफर त्यांच्या ग्राहकांसाठी नक्कीच खुशखबर आहे.