एचडीएफसी बँकेने आणले ‘चिल्लर’ अॅप

0
7

मुंबई – विविध बँका रक्कम हस्तांतरित करण्यासाठी अधिक सुलभ सुविधा देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करीत असून त्याच दिशेने पाऊल टाकत एचडीएफसी बँकेनेदेखील ‘चिल्लर’ या नावाचे एक अनोखे अॅप बाजारात आणले आहे. आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे २४ तास आपल्या फोनबुकमधील कोणत्याही संपर्क क्रमांकावर तत्काळ रक्कम पाठवण्याची सुविधा हा या अॅपचा वेगळेपणा म्हणता येईल.

तंत्रज्ञान व डिजिटल युगाचा वापर करण्याच्या बँकेच्या प्रयत्नांच्या दृष्टीने ‘चिल्लर’ अॅप महत्त्वाचा टप्पा आहे.‘गो डिजिटल’अंतर्गत एचडीएफसी उपलब्ध करून देत असलेल्या डिजिटल बँकिंग सुविधांमधील ‘चिल्लर’ हा एक नवा उपक्रम आहे. गेल्या वर्षी वाराणसीच्या घाटांवर बँकेतर्फे ‘बँक आपकी मुठ्ठी मैं’ ही मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हापासून बँकेने अनेक अभिनव डिजिटल उपक्रम सुरू केले असल्याचे एचडीएफसी बँकेच्या डिजिटल बँकिंग विभागाचे प्रमुख नितीन चुग यांनी सांगितले. अॅपसाठी एचडीएफसीने कोची येथील मोबएमई या तंत्रज्ञान कंपनीशी भागीदारी करार केला आहे. चिरंतन आजीविका उपक्रमांतर्गत या तळागाळातील नागरिकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण व अर्थसाहाय्य देणा-या एचडीएफसी बँकेच्या उपक्रमातही ‘चिल्लर’ची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली आहे.