बोइंग एमआरओ, टीसीएसचे जानेवारीत उद्‌घाटन!

0
22

नागपूर – मिहानमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प बोइंगच्या देखभाल आणि दुरुस्ती केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) काम अंतिम टप्प्यात आहे. बोइंगच्या टॅक्‍सी वेचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षाच्या प्रारंभी या दोन्ही प्रकल्पांचा श्रीगणेशा होण्याची दाट शक्‍यता आहे. बोइंगच्या विमानाच्या देखभाल व दुरुस्तीच्या परिचालनासाठी लागणाऱ्या टॅक्‍सी वेचे कामात शिवणगाववासींनी अडथळा आणला होता. त्यामुळे हे काम रखडले असताना आता ते काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पातील अडचणी त्वरित सोडविण्याचा विडा उचलला आहे. वीजपुरवठ्यासह सर्वच तांत्रिक अडचणी सोडविण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यामुळेच कंपन्यांच्या संचालकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, बोइंग आणि टीसीएसने लवकरात लवकर उद्‌घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीए भारतातील इतर ठिकाणांसह नागपुरातील प्रकल्पात युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मुलाखती घेत असल्याची माहिती आहे. बोइंगच्या मुख्य इमारत आणि ऍपरॉनचे काम पूर्णत्वाकडे आहे.
जागतिक मंदीसह अनेक तांत्रिक कारणांमुळे आधीच मिहान प्रकल्पाच्या कामाच्या प्रारंभाला उशीर झाला आहे. बोइंगच्या एमआरओने 50 एकर जागा घेतली. तेव्हा 2012 मध्ये एमआरओचे बांधकाम पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या मुहूर्तानंतर तीन मुहूर्त जाहीर केले. तेही हुकले. आता जानेवारी महिन्याचा मुहूर्त सापडला आहे. या प्रकल्पासाठी 500 कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे या मुहूर्ताकडे सर्वांचेच लक्ष्य आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) प्रकल्पात आठ इमारती बांधणार आहे. त्यातील एका इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या इमारतीत 1200 जणांना बसण्याची सोय आहे. त्याचा पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. अंतर्गत सजावटीचे कामही पूर्ण झालेले आहे. विजेच्या प्रश्‍नासह काही तांत्रिक अडचणी सुटल्यानंतर या युनिटमधील एका इमारतीतील कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्‍यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. टीसीएसचे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर चार हजार लोकांना रोजगार देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे नागपूरसह विदर्भातील युवकांना रोजगार मिळेल आणि बांधकाम क्षेत्रालाही सुगीचे दिवस येण्याचे संकेत आहे.