मुख्यमंत्रीना नको Z+ सुरक्षा

0
8

मुंबई-मुख्यमंत्र्यांना असलेली झेड प्लस सुरक्षा नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नको असून, या सुरक्षेबाबतचा मुद्दा उच्चाधिकार समितीकडे पाठवून ही सुरक्षा वाय दर्जाची करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्रीपद हे राज्याचे प्रमुखपद आहे. या पदावरील व्यक्तीसाठी १५० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह झेड प्लस दर्जाची सुरक्षा असते. देवेंद्र फडणवीस हे आमदार असताना त्यांनी कधीही एकही पोलिस सुरक्षेसाठी घेतला नाही. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. मुंबईत वर्षा बंगला आणि नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानीही मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. धरमपेठ येथील त्यांच्या घरालाही पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे त्याचा त्रास आजूबाजूच्या शेजाऱ्यांना होत आहे. परिणामी त्यांनी नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या सरकारी निवासस्थानात राहण्याचे ठरविले आहे.

मला कोणापासूनही धोका नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या सुरक्षेची गरज नाही, असे फडणवीस यांनी पोलिसांना कळविले आहे. परंतु, नक्षलवाद्यांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धोका आहे, मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीला हा धोका असतो. त्यामुळेच झेड प्लस सुरक्षा घ्यावी लागेल, असे पोलिसांचे मत आहे. परंतु, वाय दर्जाची सुरक्षा ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेसंदर्भातील उच्चाधिकार समितीला कळविले आहे.