विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून बागडे

0
6

मुंबई-विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपने फुलंब्रीतून निवडून आलेले पक्षाचे ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला.विधानसभा अध्यक्षाची बुधवारी निवड होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यास त्याला आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार दिला नाही, तर कॉंग्रेस विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत होती. मात्र, शिवसेनेनी त्याला आक्षेप घेतला. दुपारी बारा वाजेपर्यंत सदस्यांचा शपथविधी पूर्ण होणार नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवा, अशी मागणी शिवसेनेनी केली. त्यांनी या मागणीवरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत वाढविण्यात आली.