हौशी आणि व्यावसायिक रंगभूमी कलावंताना उत्तम संधी देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
14

महाराष्ट क्रमांक एकचे सांस्कृतिक राज्य होणार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

फोंडा, गोवा, दि. 8 : राज्यातील हौशी रंगभूमी आणि कलावंत तसेच व्यावसायिक मंच या सर्वाना चांगली संधी उपलब्ध व्हावी; नाटय़गृहे प्रशस्त, अद्ययावत व्हावी व त्या माध्यमातून महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य होईल असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केला.

59 व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात रविवारी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय गोखले, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. मुनगंटीवार यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना नाट्य क्षेत्रासाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. मराठी राज्य नाट्य स्पर्धा लवकरच ऑनलाइन घेण्यात येईल तसेच पूर्वी 6 विभागात होणारे नाट्य प्रशिक्षण शिबिर या पुढे 12 विभागात होईल असे ते म्हणाले. बालनाट्य स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. याखेरीज पारितोषिक रक्कम वाढविणे, परीक्षकांचे मानधन वाढविणे यांचाही प्राधान्याने विचार करणार असल्याचे श्री मुनगंटीवार म्हणाले .

समाज आणि देशाला दिशा देणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महामानवांवर महानाट्ये करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी जाहिर केले. त्याचबरोबर दुर्मीळ नाटकाच्या संहिता जपण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा तसेच स्थानिक बोलीभाषेत एकांकिका स्पर्धा सुरू करण्याचा मानसही श्री. मुनगंटीवार यांनी जाहीर केला.सांस्कृतिक विभागाचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्यात येत असल्याने कलावंत आणि त्यांच्या संस्था यांना योग्य वार्षिक नियोजन करता येईल व त्यातून दर्जेदार निर्मिती प्रेक्षकापर्यन्त पोहोचेल असे ते म्हणाले.

हॅप्पीनेस इंडेक्स ही सांस्कृतिक विभागाची जबाबदारी

सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणाले की, “इकॉनॉमीक ग्रोथ” तर हवाच सोबत “हॅप्पीनेस इंडेक्स ” वाढावा यासाठी सांस्कृतिक विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. धनाने भौतिक साधन-सुविधा मिळविता येतील, मनाच्या समाधानासाठी त्याचं मूल्यांकन करण्यासाठी सांस्कृतिक संपन्नता आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ही मराठी भाषिक राज्ये यामध्ये मागे राहणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यातील नाट्य चळवळीचे आणि रसिकांचेही श्री मुनगंटीवार यांनी भरभरून कौतुक यावेळी केले.