साखर उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
6

नवी दिल्ली, दि. 25 : साखर उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची,  माहिती  बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे माध्यमांना दिली.

नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली साखर व सहकार संबधित विविध विषयांवर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  सर्वश्री खासदार धनंजय महाडिक, डॉ. सुजय विखे पाटील, रणजित सिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते.

केंद्रीय सहकार मंत्र्यांचे आभार मानत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सहकार क्षेत्रातबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत नफेवारी (मार्जिन मनी) खेळते भांडवल (working capital)  कर्जाची पुनर्रचना, आयकर प्रलंबित विषय, इथेनॉल, आणि कोळसा निर्माण या सारख्या साखर उद्योगाशी निगडीत समस्यांच्या उपाययोजनेवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली असल्याचे, मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी अधोरेखित केले.

येत्या काही दिवसात केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून सकारात्मक उपाय आखले जातील, साखर व सहकाराविषयी योग्य निर्णय केंद्राकडून घेतले जातील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. याचा लाभ राज्यातील साखर, सहकार उद्योगाला आणि शेतकऱ्यांना होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्यातील समुद्रमार्गी होणाऱ्या निर्यातीचा टक्का वाढवून मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्‍यातून समुद्र वाहतूकीद्वारे निर्यात केली जाते. समुद्री वाहतुकीद्वारे होणाऱ्या निर्यातीचा टक्का तुलनेने कमी आहे, आज झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली असून समुद्र मार्गे होणाऱ्या निर्यातीचा टक्का केंद्र शासनाकडून वाढवून मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.

ते पुढे म्हणाले, राज्यात अनेक बंदरे आहेत. ज्यातून निर्यात होत असते. मात्र, राज्याचा निर्यातीचा  टक्का तुलनेने कमी आहे. तो वाढवून मिळण्याबाबत आज केंद्रीय गृह व सहकार मंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगत, राज्याचे टक्केवारी येत्या काळात अधिक वाढवून मिळेल, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

सहकाराच्या मुलभूत अशा प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थे (पॅक्स) च्या बळकटीकरणाची योजना केंद्र शासनाने हाती घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगून विविध 20 मुद्यांच्या माध्यमातून पॅक्सला सशक्त केले जाईल. याद्वारे पॅक्सचे येत्या काळात कृषी आधारित व्यापार संस्थेत परिवर्तन होईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. याबाबत राज्याने पुढाकार घ्यावा, अशा सूचना केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या कडून देण्यात आल्याचे सांगितले. यावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेतील, अशी माहिती,  उप‍मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.