‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
9

नवी दिल्ली, 25 : ‘लहान माझी बाहुली मोठी तिची सावली…,’ मामाच्या गावाला जाऊ या…,’ ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…’ अशा एका पेक्षा एक अजरामर कविता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या काव्य स्पर्धेला नूतन शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत आज नूतन मराठी शाळेत काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पहिली ते बारावीपर्यंच्या एकूण 23  विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

मूळ हिंदी भाषिक असणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून गेय स्वरूपात मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन देण्यासाठी  प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

नूतन मराठी शाळेचे प्राचार्य गुलशन नागपाल, शिक्ष‍िका नीना तेंडुलकर, भावना बावने, सुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इयत्ता नववीतील वर्गातील नुरसबा या विद्यार्थीनीने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सातव्या वर्गातील दिवांशू गोयल आणि निखिल या विद्यार्थ्यांचा अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक आला.

साहित्य आणि मराठी भाषा’ विषयावरील व्याख्यानाचे झाले प्रसारण

दिल्ली येथील लेखिका, ग्रंथयात्रा या यू ट्यूब चॅनलच्या होस्ट, वक्ता तसेच कॅनडा दूतावास येथील वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अर्चना मिरजकर यांचे ‘साहित्य आणि मराठी भाषा’ विषयावर आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून प्रसारण करण्यात आले.

या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, सहायक लेखा अधिकारी नीलेश केदारे हे उपस्थित होते.