हरयाणा, जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अखेर तारखा जाहीर

0
20

कलम ३७० हटवल्यानंतर होणार पहिलीच निवडणूक

तर निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली :– केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा  शुक्रवार दि.16 ऑगस्ट रोजी केली आहे.जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मतदान होईल.हरियाणामध्ये एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान होईल आणि दोन्ही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी, 4 ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली नाही.निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये 2014 पासून विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाही. 2019 मध्ये तिथे कलम 370 हटवण्यात आले होते, तेव्हापासून राष्ट्रपती राजवट लागू होती. राज्याला केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर नायब राज्यपालांच्या हातात प्रशासन आहे.तर जम्मू -काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.

जम्मू आणि काश्मीरची स्थिती काय?

जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यांपैकी 74 सर्वसाधारण, SC-7 आणि ST-9 आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार आहेत. ज्यामध्ये 44.46 लाख पुरुष, 42.62 लाख महिला, 3.71 लाख प्रथमच मतदार आणि 20.7 लाख तरुण मतदार आहेत.

विधानसभा निवडणूक तयारीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील पथकाने 8-9 ऑगस्टला जम्मू काश्मीरचा तर 12-13 ऑगस्टला हरियाणाचा दौरा केला होता. महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र आयोगाने या दोन्ही राज्यांचा दौरा केलेला नाही. त्यामुळे आज जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्याच तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, ज्ञानेश कुमार आणि एस. एस. संधू यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. तर महाराष्ट्राचा 26 नोव्हेंबर 2024, आणि झारखंडचा 5 जानेवारी 2024 रोजी संपत आहे. 2009 पासून महाराष्ट्राची निवडणूक हरियाणासोबत घेण्यात येत होती. यंदा मात्र निवडणूक आयोगाने त्यात बदल केला आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा यांची निवडणूक एकत्र होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड यांची एकत्रित निवडणूक होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा यांची निवडणूक एकत्रित घेण्याची परंपरा राहिली आहे, महाराष्ट्राची निवडणूक हरियाणासोबत का घेतली जात नाही. यात राजकीय हस्तक्षेप आहे का, या प्रश्नावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “असे म्हणणे फार सोपे असते”, असं म्हणत त्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले. आपल्या निवेदनात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात सण, उत्सव मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाचेही वातावरण आहे. त्यामुळे यंदा हरियाणासोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार नाही. नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत तिथे निवडणूक होईल.

जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.18, 25 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत.बहुमतासाठी 46 जादूई आकडा आहे. 90 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे.पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी निवडणूक होईल. त्यासाठीचे नोटिफिकेशन 20 ऑगस्टला जारी केले जाणार.नामांकन अर्ज 27 ऑगस्टपर्यंत दाखल केले जाणार.अर्जांची छाननी 28 ऑगस्टला होईल. उमेदवारी मागे घेण्याची तारीख 30 ऑगस्टपर्यंत राहाणार आहे. 18 सप्टेंबरला पहिल्या टप्यासाठीचे मतदान होईल.दुसऱ्या टप्प्यात 26 जागांसाठी 25 सप्टेंबरला मतदान होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात 40 जागांसाठी 1 ऑक्टोबरला मतदान होईल.

हरियाणामध्येही विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. नोटीफिकेशन 5 सप्टेंबरला जारी केले जाईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर असेल. 13 सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 16 सप्टेंबर असून 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी 4 ऑक्टोबर रोजी होईल.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला विलंब का?

निवडणुका घेण्यासाठी सुरक्षा रक्षकांची गरज लक्षात घेता आम्ही दोन निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला. तसंच महाराष्ट्रात नुकताच मोठा पाऊस होऊन गेला. तसंच तिथं अनेक सणही येऊ घातले आहेत, त्यामुळं सध्या महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रात गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी हे उत्सव आहेत हे लक्षात घेतलं आहे.त्याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जास्त लागणार आहे. एका वेळी दोन राज्यांच्या निवडणुकीत व्यवस्थित हाताळता येतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळं सध्या फक्त दोन राज्यांच्या निवडणुका आम्ही घोषित करत आहोत.सध्या महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.