मुंबई:-निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषद जम्मू कश्मीर व हरियाणातील विधानसभा निवडणूकांची घोषणा करतील. महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ देखील नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणूकांची देखील घोषणा होईल अशी आशा होती.मात्र निवडणूक आयोगाने राज्यातील पाऊस व जम्मू काश्मीरमधील निवडणूकांसाठी लागणाऱ्या अधिक सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत तुर्तास तरी महरााष्ट्राच्या निवडणूकांबाबत कोणतीही घोषणा केली नाही.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणूकांची घोषणा केलेली नाही त्यावरून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फटकारले आहे. ”एक राष्ट्र एक निवडणूक अशी चर्चा होत असताना संपूर्ण तडजोड आयोगाने (उर्फ निवडणूक आयोग) जम्मू कश्मीरमधला सुरक्षेच्या मुद्द्याचे कारण देत महाराष्ट्रातील निवडणूका सोबत न घेता तात्पुरत्या लांबणीवर टाकल्या आहेत. मग भाजपच्या मजबूत नेतृत्वात जम्मू कश्मीरमध्ये काय बदल झाला आहे? दहशतवादी हल्ले वाढत आहेत हे सत्य आहे. त्यांनी निवडणूक न घेण्याचं आणखी एक कारण दिलं ते म्हणजे पाऊस. पावसामुळे ते त्यांची औपचारिकता पूर्ण करू शकले नाही. निवडणूक आयोगाच्या मते फक्त महाराष्ट्रातच मान्सून आहे. इतर राज्यात नाही. एकेकाळी नावाजलेली ही संस्था दिवसेंदिवस किती लाजिरवाणी होत चालली आहे! त्यांचे बॉस त्यांना महाराष्ट्रात निवडणूका घ्यायची परवानगी देत नाहीएत. या बेकायदेशीर व घटनाबाह्य मिंधे भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तो कधी नव्हताही. राज्याने त्यांना एकदा नाकारलंय व पुन्हा नाकारणार आहे. असं वाटतंय की निवडणूक आयोग त्यांना व त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आपले राज्य लुटण्यासाठी आणखी वेळ देत आहे”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी चले जाव मिंधे सरकार असा नारा देखील दिला आहे.
जम्मू कश्मीर व हरियाणा सोबतच महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळही पूर्ण होत असल्याने निवडणूक आयोग आज निवडणुकीची घोषणा करेल अशी आशा होती. मात्र तसे काही घडले नाही. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरणही दिले. ”जम्मू-कश्मीर आणि हरयाणात एकाचवेळी निवडणूक होईल. मात्र महाराष्ट्रातील सध्याच वातावरण पाहता निवडणूक नंतर घेतली जाईल. महाराष्ट्रात मतदार याद्या अपडेट करण्याचे काम अद्याप बाकी आहे. यासह पावसाचे वातावरणही असून त्यानंतर पितृपक्ष, गणेशोत्सव आणि दिवाळी यासारखे मुख्य सण आहेत. महाराष्ट्रात सध्या मॉन्सून सक्रिय आहे. तसेच एकामागोमाग एक मुख्य सण येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
राज्यघटनेनुसार विधानसभेचा कार्यकाळ संपल्यावर पुढील 6 महिन्यात कधीही निवडणूक घेतली जाऊ शकते. हा निवडणूक आयोगाचा विशेषाधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.