मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार;2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला

0
11

इंफाळ:-मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात शनिवारी तीन लोकांची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करणारे आंदोलक इम्फाळमधील दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरात घुसले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री आणि आमदारांच्या घरांवर जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे इंफाळ पश्चिम प्रशासनाला जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करावे लागले. हल्ल्याच्या या घटनेनंतर इंफाळ पश्चिम, पूर्व, बिष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूरमध्ये इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा दोन दिवसांसाठी बंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आंदोलक सगोलबंद भागातील भाजप आमदार आरके इमो यांच्या घराबाहेर जमले होते. आंदोलकांनी सरकारने 3 जणांच्या हत्येप्रकरणी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी केली. ही मागणी करतानाच आंदोलकांनी घोषणाबाजीही करायला सुरुवात केली. इमो हे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे जावई आहेत. 3 लोकांची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 24 तासात ही अटक करावी ही मागणी आंदोलकांनी केली आहे.

एका अधिकाऱ्याने हिंसाचाराबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की किशमथोंग मतदारसंघाचे अपक्ष आमदार सपम सिंह यांचं घर टिडीम रोडवर आहे. त्यांच्या घराबाहेरही आंदोलन करण्यात आले. सिंह घरात नाही असे कळाल्यानंतर आंदोलकांनी सिंह यांच्या मालकीच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला. शुक्रवारी रात्री मणिपूर -आसाम सीमेवरील जिरी आणि बराक नदीच्या संगमावर तीन जणांचे मृतदेह सापडले आहे. हे मृतदेह जिरीबाम जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या सहा लोकांपैकी तिघांचे होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिरीबाममधील बोकोबेरा भागात कुकी दहशतवाद्यांनी एका जमातीतील महिला आणि मुलांचे अपहरण केले होते. याच दहशतवाद्यांच्या दुसऱ्या तुकडीसोबत सीआरपीएफच्या जवानांची चकमक सुरू होती. ही चकमक सुरू असतानाच हे अपहरण करण्यात आले होते. या चकमकीमध्ये 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंदू मैतेई आणि ख्रिस्ती कुकी जमातींमध्ये संघर्ष सुरू आहे.