नवी दिल्ली/वृत्तसेवा-निवडणूक आयोगाकडून रविवारी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी होणार्या विधानसभा निवडणुकांची घोषण करण्यात आली. त्यानुसार 9 ते 29 एप्रिलदरम्यान मतदान होईल आणि 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक जाहीर होताच संबंधित राज्यांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासोबतच गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये पोटनिवडणुकीची घोषणाही निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी 126 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल.
केरळमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात 140 जागांसाठी व्होटींग होईल आणि 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत 294 जागांवर मतदान प्रक्रिया संपन्न होईल आणि 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल. तामिळनाडू राज्यात 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात 234 जागांसाठी मतदान होईल आणि 4 मे राजी निकाल जाहीर केला जाईल. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न हाईल आणि 4 मे रोजी निकाल लागतील.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार त्यांनी सांगितले की, निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये मतदार यादीची विशेष सघन पुनरावृत्ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. तसेच आयोगाने सर्व राज्यांना भेट देत तयारीचा आढावा घेतला आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून सूचना घेतल्या. कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहायला नको, किंवा अपात्र मतदाराचा यादीत समावेश व्हायला नको, असे ते म्हणाले. मतदान केंद्रांवर तैनात अधिकारी दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी वेबसाईटवर अपलोड करतील, तसेच निवडणूकीबाबतची सर्व माहिती एका अॅप्सवर मिळले, असेही त्यांनी सांगितले.
आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक आणि इतर अंमलबजावणी संस्थांच्या नोडल अधिकाऱ्यांशीही बैठक घेतल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय संबंधित राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्याशीही चर्चा करण्यात आली.
या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी सुमारे 17.4 कोटी मतदार मताधिकाराचा हक्क बजावणार आहेत. एकूण 824 विधानसभा जागांसाठी 2.19 लाख मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत जवळपास 2.5 कोटी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.





