भारताच्या ७८ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर पाकिस्तानचा कब्जा

0
8

नवी दिल्ली (पीटीआय)- भारताच्या जम्मू-काश्मीरमधील ७८ हजार चौरस मीटर जमिनीवर पाकिस्तानने १९४८ पासून अनधिकृतपणे कब्जा केला आहे, अशी माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिज्जू म्हणाले की, चीन आणि पाकिस्तानमध्ये १९६३ मध्ये झालेल्या करारानुसार पाकिस्तानने भारताची ५१८० चौरस किलोमीटर जमीन चीनला देऊन टाकली आहे. तसेच भारत आणि चीनच्या सीमेवर निश्चित प्रत्यक्ष नियंत्रण रेषा नाही. या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून वेळोवेळी वाद निर्माण झालेले आहेत.
बांगलादेश, म्यानमार आणि भूतानने भारताची कोणतीही जमीन अवैधरित्या बळकावलेली नाही. मात्र, भारत आणि बांगलादेशातील काही भागात स्थानिकांनी एकमेकांची जागा बळकावलेली आहे. केंद्र सरकार देशाची सुरक्षा आणि एकात्मता कायम राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करेल, असे रिज्जू यांनी सांगितले.
भारत आणि चीनमधील सीमेवरून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत भारत सातत्याने लक्ष ठेवून आहे. यासाठी सीमेवर तैनात केलेल्या सैनिकांच्या बैठका, ध्वज बैठका, चर्चेचे स्वरूप ठरवण्यासाठी बैठका, सीमा व्यवहाराबाबत समन्वय आणि मुत्सद्दीपणा आदिंचा वापर केला जात आहे.