साध्वींच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम

0
9

नवी दिल्ली-वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीव विरोधक ठाम आहेत. साध्वी यांची हकालपट्टी केल्याशिवाय राज्यसभेचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका प्रंमुख विरोधी पक्ष काँग्रेसने घेतली आहे. साध्वी यांनी वक्तव्याप्रकरणी माफी मागितली असल्याने हा विषय संपवण्याची विनंती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी विरोधकांना लोकसभेत केली.
वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोत्यात आणणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या बचावासाठी अखेर मोदींना स्पष्टीकरण द्यावं लागलं. ‘मंत्री ज्योतींनी माफी मागितली आहे, त्यामुळे देशहितासाठी सभागृहाचं कामकाज चालू द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं.
निरंजनाची काजळी मात्र पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित असल्याने त्यांनीच या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याच्या मागणीवर विरोधक ठाम होते. मोदींविरोधात आगपाखड करून काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी सभात्याग केला.
विशेष म्हणजे परदेश दौऱ्यांमुळे टीकेचे धनी झालेले पंतप्रधान मोदी आठवडाभरानंतर सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे विरोधकांनी थेट त्यांच्यावरच हल्ला चढवला. अत्यंत अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या साध्वींचे मंत्रिपद कसे काय कायम राहू शकते, असा जाब विरोधकांनी विचारला. विरोधकांच्या या आक्रमक माऱ्यापुढे सत्ताधारी हतबल दिसत होते.