अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर व्हावे!

0
12

वृत्तसंस्था
लखनौ : अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात आले पाहिजे, असे सांगून राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातून आपण बाहेर पडत असल्याचे या खटल्यातील प्रमुख वादी हाशिम अन्सारी यांनी बुधवारी जाहीर केले. बाबरी मशीद विध्वंसाला २२ वर्षे पूर्ण होत असतानाच वादी अन्सारी यांनी खटल्यातून अंग काढण्याचा निर्णय घेतला आहे, हे विशेष.

‘या मुद्याचे राजकारण करण्यात आले आहे आणि आता हा मुद्दा धार्मिक राहिलेला नाही. या खटल्यातून माघार घेण्याची माझी इच्छा आहे. माझी ही इच्छा मी लेखी स्वरूपात सर्वोच्च न्यायालयाला कळविणार आहे. ६ डिसेंबरला मी ‘यौमे गम’ (शोक दिवस) कार्यक्रमात भाग घेणार नाही. त्या दिवशी मी आपल्या घरीच राहीन,’ असे अन्सारी म्हणाले.

‘आजम खानसारखे राजकारणी हा मुद्दा जटिल बनविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे मी खटल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात आले पाहिजे. रामलल्लाची तंबूतून सुटका झाल्याचे आणि त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्यात आल्याचे मला बघायचे आहे,’ असे अन्सारी यांनी म्हटले आहे. बाबरी मशीद पाडणाऱ्या आरोपींना शिक्षा करण्याचे अभिवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिले तर आपण या मुद्यावर शांततापूर्ण वाटाघाटीसाठी त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत, असेही अन्सारी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकत्र बसून चर्चा करण्यास तयार आहे. परंतु मोदींनी या मुद्यावर चर्चा सुरू होण्याआधी बाबरी मशीद विध्वंस खटला जलद गती न्यायालयापुढे आणावा, अशी माझी इच्छा आहे.’