धर्मांतरावरुन लोकसभेत गदारोळ

0
9

नवी दिल्ली – आग्र्यामध्ये झालेल्या धर्मांतरावरुन सलग दुस-या दिवशी गुरुवारी लोकसभेत गदारोळ झाला. सर्व विरोधीपक्षांनी या मुद्यावर एकत्र येत प्रश्नोत्तराचा तास निलंबित करुन, धर्मांतराच्या मुद्यावरुन चर्चेची मागणी केली.
सभागृहाचे कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि सीपीएमचे खासदार सभापतींसमोरच्या मोकळया जागेत जमले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु केली. काँग्रेसचे सभागृहातील नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे धर्मांतराच्या विषयावर चर्चेला परवानगी देण्याची मागणी केली.
प्रश्नोत्तराचा तास निलंबित करण्याचा तुमच्याकडे पूर्ण अधिकार आहे. सरकारही या विषयावर चर्चेला तयार आहे त्यामुळे चर्चेला परवानगी द्यावी अशी खर्गे यांनी मागणी केली. धर्म परिवर्तनाच्या विषयावर चर्चेची आमची तयारी आहे. आम्हाला धर्म परिवर्तना विरोधात कायदा हवा आहे असे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले.
धर्म परिवर्तनाचा मुद्या गांर्भीयाने घेणे आवश्यक आहे अन्यथा उद्या यावर दंगली होतील असे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव म्हणाले. आग्र्यामध्ये सोमवारी एका सोहळयामध्ये २०० मुस्लिमांनी धर्मांतर करुन, हिंदू धर्मात प्रवेश केला होता.