राज्यघटनाच आमचा राष्ट्रीय ग्रंथ – ज्योतिरादित्यचा सरकारवर हल्ला

0
14

नवी दिल्ली-फक्त राज्यघटनाच आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, दुसरा कुठलाही ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ होऊ शकत नाही, असे सांगत कॉंग्रेस नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत आग्रामधील मुस्लिम धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर कडवी टीका केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दल यांच्या पुढाकाराने आग्रा येथे २०० मुस्लिमांचे धर्मांतरण करण्यात आल्याच्या मुद्द्याचे गुरुवारी लोकसभेत तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी या मुद्द्यावर प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विरोधकांची मागणी तात्काळ मंजूर केली नाही. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास नियम १९३ नुसार या विषयावर चर्चा घेण्यात आली. चर्चेच्या सुरुवातीला ज्योतिरादित्य शिंदे यांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवला.
ते म्हणाले, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच धर्मांतरणाचे प्रकार घडू लागले आहेत. काळा पैसा भारतात परत आणणे, पाकिस्तानकडून होणारे हल्ले रोखणे या सर्व कामात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. आपल्या मूळ विषयापासून सरकार दूर जाऊ लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सरकार आमच्या मुठीत असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. दुसरीकडे सरकारचे मंत्रीही संघाच्या नेत्यांपुढे डोकं टेकवायला जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पूर्वी त्यांच्याच पक्षाच्या तत्कालिन पंतप्रधानांनी राजधर्म पाळायला हवा, असा सल्ला दिला होता. तो सल्ला आजही अमलात आणला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.