काश्‍मीरमध्ये 17 जवान हुतात्मा

0
6

श्रीनगर – उत्तर काश्‍मीरमधील उरी शहरात रविवारी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह घुसखोरी करत दहशतवाद्यांनी एका बटालियन मुख्यालयावर हल्ला केला. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाले असून 19 जण जखमी झाले. दरम्यान,  जवानांना चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 

सूत्रांकडून प्राप्त माहितीुसार,  सकाळी चारच्या दरम्यान दहशतवादी हल्ल्याबरोबर स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि चकमक सुरू झाली. येथून 102 किलोमीटर अंतरावर आणि लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर असलेल्या उरीमध्ये हा हल्ला झाला. 
दरम्यान, मारले गेलेले दहशतवादी “जैशे महम्मद‘ या संघटनेचे होते आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता, अशी माहिती लष्करी मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीरसिंह यांनी दिली. त्याचप्रमाणे दहशतवाद्यांकडील साहित्य पाकिस्तानमधील असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या वेळी डोगरा रेजिमेंटचे जवान एका तंबूत झोपले होते. स्फोटामुळे या तंबूला आग लागली आणि ती जवळपासच्या बराकींमध्येही पसरली, असे सूत्रांनी स्पष्ट केले. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाल्याची माहिती लष्कराच्या नॉर्दर्न कमांडने दिली. अन्य 19 जवान जखमी झाले असून, सुमारे पाच तासांच्या चकमकीनंतर या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. दरम्यान, जवानांची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती लष्कराने एका निवेदनाद्वारे दिली. आम्ही 17 जवानांच्या हौतात्म्याला सलाम करतो, असेही यामध्ये म्हटले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबिरसिंह सुहाग हे तातडीने काश्‍मीरला रवाना झाले. गृह मंत्रालयानेही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. उच्चस्तरीय बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव, उच्च लष्करी, निमलष्करी आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.