महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पिता-पुत्र-पुतण्याची चौकशी

0
7

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात भुजबळ पिता-पुत्र आणि पुतण्याची चौकशी होणार आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. याप्रकरणी छगन भुजबळ, त्यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांचीही खुली चौकशी होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी अवैधरित्या ठेके दिल्याचा आरोप, दमानिया यांनी याचिकेत केला आहे.

याप्रकरणी भुजबळांच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश, कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. या समितीमध्ये अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी आणि लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

या समितीने भुजबळांची चौकशी करून 20 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत.