दिल्ली- प्रसार माध्यमामध्ये केलेली परस्पर वक्तव्य परराष्ट्र मंत्रालय सेवेतील आयएफएस अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना चांगलेच भोवले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्याकडील कार्यभार काढून घेतला आहे. त्यांना डेव्हलपमेंट पार्टनरशिप डिव्हिजनच्या संचालकपदावरून काढण्यात आलंय आणि सक्तीची विश्रांती देण्यात आलीय.
देवयानी खोब्रागडे यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत न्यूयॉर्कच्या घटनेबद्दल वक्तव्य केलं होतं. खोब्रागडे यांनी परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी न घेता असं विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
तसंच देवयानी यांनी आपल्या मुलांचे अमेरिकी पासपोर्ट असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाकडे दिली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना पदापासून दूर हटवलं आहे. मात्र, आपण राजीनामा देणार नाही असं देवयानी यांनी स्पष्ट केलं.
गेल्या वर्षी देवयानी खोब्रागडे चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या अमेरिकेतल्या घरी काम करणार्या मोलकरणीला नीट वागणूक न दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच त्यांना अटकही करण्यात आली होती. भारताच्या दबावानंतर अमेरिकेनं त्यांची सुटका केली होती.