रेल्वेचे खासगीकरण करणार नाही – नरेंद्र मोदी

0
14

नवी दिल्ली, – रेल्वेच्या खासगीकरणाला रेल्वे युनियन्सकडून विरोध सुरु असतानाच रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. जगभरातून पैसे आणून आम्हाला रेल्वेचा आणि त्या माध्यमातून देशाचा विकास घडवायचा आहे असे मोदींनी म्हटले आहे.

वाराणसीतील रेल्वे वर्कशॉपच्या विस्तारीकरणाच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ झाला. याप्रसंगी मोदींनी रेल्वेच्या खासगीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. रेल्वे आणि माझे जवळचे नाते आहे, माझे आयुष्यच रेल्वेतून घडले आहे अशी आठवण सांगत मोदी म्हणाले, रेल्वेच्या खासगीकरणाच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. आम्ही रेल्वेचे खासगीकरण करणार नाही. रेल्वेच्या विकासासाठी डॉलर येवो किंवा पैसे यातून रेल्वे संघटनांना काय फरक पडतो, यातून तुमचाच विकास होणार आहे असे त्यांनी नमूद केले. देशाच्या चारही भागांमध्ये रेल्वे विद्यापीठांची स्थापना करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोदींनी सांगितले. रेल्वे व पोस्ट ऑफीस यांचे जाळे देशाच्या कानाकोप-यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या दोघांच्या माध्यमातून देशाचा विकासामध्ये मोलाचा हातभार लागू शकते असा दावाही मोदींनी केला.