कर्णधार धोनीचा कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा

0
11

मेलबर्न-ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीच्या या ‘बॉम्ब’ने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, धोनीच्या राजीनाम्यामुळे ६ जानेवारीला सुरू होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या सिडनी कसोटीचे कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. ‘बीसीसीआय’ने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली देशात आणि विदेशातही भारतीय संघाने मोठे यश मिळवले. कसोटीत मागे पडलेल्या भारतीय संघाला धोनीनेच पहिल्या स्थानीही नेऊन ठेवण्याचा पराक्रम केला. धोनीच्या कल्पक नेतृत्वामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिकेसारख्या कसोटीतील बलाढ्य संघांनाही भारताने तगडे आव्हान उभे केले. आज मात्र ऑस्ट्रेलियाकडून २-० असा मालिका पराभव पदरात पडल्याने धोनीने निवृत्तीचा टोकाचा निर्णय घेतला. वनडे आणि टी-२० कडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे धोनीने सांगितले.

धोनीने आपल्या यशस्वी कारकीर्दीत ९० कसोटी सामन्यांमधून ४ हजार ८७६ धावा तडकावल्या आहेत. त्याच्या नावावर ६ शतकं, ३१ अर्धशतकांची नोंद आहे. २२४ ही त्याची वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नईत त्याने ही खेळी केली होती.