मुंबई-‘मानवतेसाठी विज्ञान’ हे ब्रीदवाक्य असलेली १०२वी इंडियन सायन्स काँग्रेस ३ ते ७ जानेवारीदरम्यान मुंबई विद्यापीठात होत आहे. मात्र, विज्ञान व पर्यावरणावरील या चर्चासत्राचा शामियाना उभारण्यासाठीच पर्यावरणाचा बळी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. या काँग्रेसचा शामियाना उभारण्यासाठी विद्यापीठातील २८ वृक्ष मुळांसकट हलवण्यात आले आहेत. यातील किती वृक्ष जगतील, याबाबत शंका असली तरी आशियातील सर्वात मोठय़ा शामियान्याचा थाट मिरवण्याची संधी मात्र आयोजकांना नक्की मिळणार आहे.
विद्यापीठाच्या कलिना परिसरात होणाऱ्या या पाच दिवसांच्या परिषदेसाठी देशविदेशातून तज्ज्ञ येत असून त्यासाठी या ठिकाणी मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. या शामियान्यात ७९ झाडे अडथळा आणत असल्याने ती बाजूला काढण्याची परवानगी विद्यापीठाने जून २०१४ मध्ये वृक्ष प्राधिकरणाकडे मागितली होती. मात्र, ५१ झाडांचा नियोजित शामियान्याला अडथळा नसल्याचे सांगत २८ झाडे पुनरेपित करण्याची परवानगी प्राधिकरणाने डिसेंबरच्या बैठकीत दिली. त्यानंतर लगेचच हे १५ वर्षांपासूनचे वृक्ष मुळासकट उखडण्यात आले.
एवढय़ा मोठय़ा आंतरराष्ट्रीय सोहळ्यासाठी काही झाडे तोडली जाणे योग्य असल्याचे व्यवहार्य ज्ञान आयोजकांकडून मांडले जात आहे. मात्र, पाच दिवसांच्या परिषदेसाठी गेली १५ वर्षे या जमिनीत मुळे रोवून बसलेले वृक्ष हटवण्याचे तत्त्वज्ञान पर्यावरणाबाबतची दुटप्पी भूमिका अधोरेखित करणारे आहेत. दरम्यान, शामियाना उभारण्याची गरज म्हणून हे वृक्ष अन्यत्र हलवण्यात आले असले तरी ते जगवण्यात येतील, असे आश्वासन विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी दिली. तर याआधीही वटवाघळांचा त्रास होत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून विद्यापीठाने महिला वसतिगृहासमोरच्या झाडांच्या फांद्या खोडापर्यंत छाटल्या होत्या, असे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी म्हटले.
सुरुवातीला महानगरपालिकेकडून सरसकट झाडे कापण्यासाठी परवानगी दिली जात असे, मात्र आता झाडे पुनरेपित करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आतापर्यंत पुनरेपित केलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली याची नोंद महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा