नवी दिल्ली- कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वडेरा यांची हरियाणातील ‘स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी’ ही कंपनी आता वादाच्या भोवर्यात सापडली आहे. प्राप्तीकर विभागाने वडेरा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी या कंपनीला नोटीस बजावली आहे. जमीन खरेदी व विक्री प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडेरांच्या कंपनीच्या मुख्य अधिकार्यांना बजावण्यात आलेल्या या नोटीसीमध्ये वादग्रस्त जमीन आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात प्राप्तीकर विभागाने स्पष्टीकरण मागितले आहे.
मनेसार आणि हरियाणात ‘स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी’च्या मालकीची जवळपास चार एकर जमीन आहे. तसेच बिकानेर आणि राजस्थानमध्ये 470 एकर जमीन आहे. प्राप्तीकर विभागाने हरियाणात स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने डीएलएफ आणि ओमकारेश्वर प्रॉपर्टीज यांच्याबरोबर केलेल्या आर्थिक व्यवहारांचे तपशील मागविले आहेत.
कंपनीला 2005-06 नंतर जमिनीच्या खरेदी- विक्रीचे अॅग्रीमेंटबाबतची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच खरेदी-विक्रीचा व्यवहार, कृषी जमिनीच्या विक्रीतून झालेल्या नफ्याचा अहवाल, स्कायलाइटशी संबंधित अन्य संपतीची माहिती, बोर्ड मिटिंग्जमधील मुद्दे, व्याजाचा अहवाल मागविला आहे.