ताडोब्यात वाघिणीचा मृत्यू

0
15

चंद्रपूर-येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बफरझोनमधील जंगलात एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.हा मृत्यु कशामूळे झाला याचा शोध वनाधिकारी घेऊ लागले आहेत.या घटनेमुळे जंगलातील वण्यप्राणी सुद्दा सुरक्षित राहिले नसल्याची भिती वन्यप्रेमी व्य्क्त करु लागले आहेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातील मुधोली गावानजीक पूर्णवाढ झालेल्या एका वाघिणीचा संशयास्पदस्थितीत मृत्यू उघडकीस आला. गावाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत वाघिणीचा मृतदेह मिळाल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. दोन वाघांची झुंज, चार चाकी वाहनाची धडक की विषप्रयोग यापैकी कशाने तरी हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी विसेरा व तिच्या शरीराचे अवयव हैद्राबाद व बंगलोर येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या मुधोली या गावातील वनविभागाच्या कर्मचार्‍याला मुख्य रस्त्यालगत वाघ पडून असलेला दिसला. त्याने या घटनेची माहिती ताडोबा बफर कार्यालयाला दिली. माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जवळ जाऊन बघितले असता एक पूर्णवाढ झालेली वाघीण मृतावस्थेत पडलेली होती.
या घटनेची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. गरड, ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. प्रथमत: हा विष प्रयोगाचा प्रकार वाटत होता. पण वाघिणीच्या शरीरावर असंख्य जखमाही होत्या. त्यामुळे विषप्रयोग नसून दोन वाघांच्या झुंजीत किंवा एखाद्या चारचाकी वाहनाच्या धडकेत तिचा मृत्यू झाला असावा अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. वाघिणीचा किमान एक दिवस अगोदर मृत्यू झाला असावा, असाही अंदाज वनखात्याने व्यक्त केला आहे. वाघिणीचे शवविच्छेदन केले असता खांदा, पाय आणि पाठीवर असंख्य जखमा होत्या, तर तळव्याला अतिशय खोलवर जखम झाली होती.